घरक्रीडाभारताचा माजी गोलंदाज अमित भंडारीवर जीवघेणा हल्ला

भारताचा माजी गोलंदाज अमित भंडारीवर जीवघेणा हल्ला

Subscribe

भारताचा माजी गोलंदाज तसेच दिल्ली व जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (डीडीसीए) वरिष्ठ निवड समितीचा अध्यक्ष अमित भंडारीवर सोमवारी २३ वर्षांखालील संघाच्या चाचणीदरम्यान अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. यामध्ये भंडारीच्या डोक्याला आणि कानाला जखम झाली आहे.

भंडारीवर हल्ला होताच त्याचे सहकारी सुखविंदर सिंह यांनी त्याला रुग्णालयात नेले. पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधीच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला होता. या हल्लेखोरांची गय करणार नाही असे डीडीसीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी स्पष्ट केले आहे, तसेच हा हल्ला राष्ट्रीय स्पर्धेसाठी दिल्लीच्या २३ वर्षांखालील संघाच्या संभाव्य खेळाडूंमध्ये समावेश न झालेल्या एका खेळाडूने घडवून आणल्याची शक्यता आहे, असेही शर्मा म्हणाले.

- Advertisement -

घडलेल्या घटनेची माहिती देताना २३ वर्षांखालील संघाचे व्यवस्थापक शंकर सैनी म्हणाले, मी तंबूत जेवत होतो. भंडारी आणि अन्य एक निवड सदस्य व सिनिअर संघाचे प्रशिक्षक मिथुन मन्हास संभाव्य खेळाडूंचा ट्रायल मॅच पहात होते. त्यावेळी दोन लोक आले भंडारी यांच्याजवळ गेले. त्यांची भंडारींसोबत शाब्दिक चकमक झाली. ते निघून गेले. त्यानंतर लगेचच १५ जण हॉकी स्टीक्स, लोखंडी सळ्या, सायकलच्या साखळ्या घेऊन आले. चाचणीत सहभागी सिनियर संघाचे काही खेळाडू आणि आम्ही भंडारींना वाचवायला धावलो, पण हल्लेखोरांनी आम्हाला धमकावले की मध्ये पडल्यास गोळी मारू. त्यांनी नंतर भंडारींना हॉकी स्टीक, लोखंडी सळ्यांनी मारले आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.

देशाच्या राजधानीत असा प्रकार घडणे निंदनीय – गंभीर

- Advertisement -

भारत आणि दिल्लीचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने या प्रकरणाविषयी ट्विट केले. असा प्रकार देशाच्या राजधानीत घडणे खूपच निंदनीय आहे. या प्रकरणावर पडदा पडता कामा नये आणि मी तसे होऊ देणार नाही. सर्वात आधी संघात निवड झाली नाही म्हणून ज्या खेळाडूने हा हल्ला घडवून आणला आहे, त्याच्यावर आजीवन बंदी घालण्याची मी मागणी करतो, असे गंभीरने या ट्विटमध्ये लिहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -