Women’s World Cup 2022: भारतीय कर्णधार मिताली राजचं महिला विश्वचषकापूर्वी मोठं वक्तव्य, म्हणाली..

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने महिला विश्वचषकापूर्वी मोठं वक्तव्य केलं आहे. टीम इंडियाचे फलंदाज शेफाली वर्मा आणि ऋचा घोष यांसारख्या युवा खेळाडूंनी उच्च स्तरावर मोठं आव्हान दिल्याचं वक्तव्य कर्णधार मिताली राजने केलंय. मागील काही महिन्यांमुळे पुढील महिन्यात होणाऱ्या वनडे विश्वचषकापूर्वी संघाचे संजोयन तयार करण्यासाठी मोठी मदत झाली आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत भारताने काही नवीन कौशल्यांचा वापर केला आहे. न्यूझीलंडमध्ये ४ मार्चपासून वर्ल्डकपला सुरूवात होणार आहे.

आम्ही युवा खेळाडूंची प्रतिभा आजमावली

मिताली राजने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ती म्हणाली की, आम्ही संघातील काही युवा खेळाडूंची प्रतिभा आजमावली. यामध्ये सर्वच खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं आहे. त्यामुळे असं वाटतयं की, संघातील सर्व खेळाडूंची त्या स्तरावर खेळण्याची क्षमता आहे. वेगवान फलंदाजांमध्ये शेफाली आणि ऋचा यांसारख्या खेळाडूंचा समावेश असून गोलंदाजांमध्ये मेघना सिंग आणि पूजा वस्त्राकर यांसारख्या खेळाडूंचा समावेश असल्याचं मितालीने सांगितलं आहे.

हरमनप्रीत विश्वचषकासाठी भारताची उपकर्णधार

या खेळाडूंनी अनेक सामने खेळले आहेत आणि मालिकांमध्ये मला कर्णधार म्हणून संघाच्या रचनेत हे खेळाडू कुठे बसतात, याची मला जाणीव आहे, असं राज म्हणाली. न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी दीप्ती शर्माला उपकर्णधार करण्याचा निर्णय निवडकर्त्यांचा आणि बीसीसीआयचा होता. हरमनप्रीत विश्वचषकासाठी भारताची उपकर्णधार असल्याचं मितालीने म्हटलं आहे.

मला विश्वचषकात चांगला फॉर्म ठेवायचा आहे

जेव्हा तुम्ही मोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेता. त्यावेळी तुम्ही केवळ युवा खेळाडूंवर अवलंबून नसून त्यांच्या अनुभवावरही अवलंबून रहावे लागते. अशा दोन्ही खेळाडूंना खेळण्याची संधी देणे म्हणजे एक प्रकारचं मिश्रण आहे. माझ्या कामगिरीवर मी खूश असून मला विश्वचषकात चांगला फॉर्म कायम ठेवायचा आहे. पहिल्यांदाच विश्वचषकासाठी जाणाऱ्या खेळाडूंवर दबाव न टाकण्याचा आणि मोठ्या स्तरावर खेळण्याचा आनंद घेण्याचा सल्ला मितालीने दिलाय. तसेच भारतीय संघ ६ मार्च रोजी पाकिस्तानविरूद्धच्या विश्वचषकात आपल्या मोहिमेला सुरूवात करणार आहे.


हेही वाचा : Russia-Ukraine Crisis: No War Please..रशियाच्या टेनिसपटूने युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिला अनोखा संदेश, व्हिडिओ व्हायरल