भारतीय संघाला मिळाले निकृष्ट दर्जाचे जेवण, सरावालाही दिला नकार

टी २० वर्ल्डकल्पच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात आहे. मात्र, येथे भारतीय संघाची आबाळ होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आयसीसीकडून भारतीय संघाला थंड जेवण देण्यात आले असून राहत्या हॉटेलपासून सरावासाठी दिलेलं मैदान ४५ मिनिटांच्या अंतरावर असल्याची तक्रार भारतीय संघाने आयसीसीकडे केली आहे. त्यामुळे भारतीय संघाने सरावालाही नकार दिल्याची माहिती समोर येत आहे.

सिडनी मैदानात गुरुवारी भारत विरुद्ध नेदरलँड असा सामना रंगणार आहे. मात्र, सामन्याआधीच भारतीय संघ नाराज झाला आहे. जेवणामध्ये त्यंना फक्त सॅण्डवीच दिल्याचा आरोप करण्यात येतोय. स्पर्धकांना जेवण पुरवण्याची जबाबदारी आयसीसीकडे असते. मात्र, भारतीय स्पर्धकांना मिळालेलं जेवण चांगलं नव्हतं, असं सांगण्यात येतंय.

तसंच, भारतीय संघाला सरावासाठई देण्यात आलेलं ब्लॅकटाऊनमधील मैदान हॉटेलपासून ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे सरावासाठी एवढ्या लांब जाण्यास भारतीय संघाने नकार दिला आहे.

रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला रंगला. अत्यंत अटीतटीच्या रंगलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला धुळ चारली. तर, आता गुरुवारी भारत विरुद्ध नेदरलँड असा सामना रंगणार आहे.