घरक्रीडाभारताचे माजी क्रिकेटपटू माधव आपटे यांचे निधन

भारताचे माजी क्रिकेटपटू माधव आपटे यांचे निधन

Subscribe

भारताचे माजी कसोटीपटू माधव आपटे यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकालाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांनी मुंबईतील ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

सलामीवीर असणार्‍या आपटे यांनी १९५२ ते ५३ या कालावधीत ७ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. या सामन्यांमध्ये त्यांनी ४९.२७ च्या सरासरीने ५४२ धावा केल्या. यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्धमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ५१.११ च्या सरासरीने ४६० धावा केल्या होत्या. एका कसोटी मालिकेत ४०० धावांचा टप्पा पार करणारे ते पहिले भारतीय सलामीवीर होते. या दौर्‍यात त्यांनी केलेली १६३ धावांची खेळी खूप गाजली होती.

- Advertisement -

तसेच त्यांनी ६७ प्रथम श्रेणी सामने खेळताना ६ शतके आणि १६ अर्धशतकांसह ३३३६ धावा केल्या. त्यांनी रणजी करंडकात मुंबईकडून पदार्पण करताना सौराष्ट्रविरूद्धच्या सामन्यात शतक झळकावले होते. त्यांनी १९६७-६८ च्या रणजी मोसमात आपला अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळला. मात्र, त्यानंतरही ते कांगा लीगसारख्या स्पर्धांमध्ये खेळत राहिले. १९३२ साली बॉम्बेमध्ये (मुंबई) जन्मलेल्या आपटे यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात लेगस्पिनर म्हणून केली होती. एल्फिस्टन कॉलेजचे विद्यार्थी असणार्‍या आपटे यांना विनू मंकड यांचे मार्गदर्शन लाभले होते.

१९८९ साली आपटे यांची क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) अध्यक्षपदी निवड झाली होती आणि त्यांनी लेजंड्स क्लबचेही अध्यक्षपद भूषवले. तसेच त्यांनी मुंबईचे नगरपाल म्हणूनही काम केले होते.

- Advertisement -

केवळ ७ कसोटी सामने का?

कसोटी क्रिकेटमध्ये जवळपास ५० च्या सरासरीने धावा करूनही माधव आपटे यांना केवळ ७ सामनेच खेळण्याची संधी मिळाली. याबाबत आपटे यांनी आत्मचरित्रात लिहिले की, लाला अमरनाथ हे त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी माझ्या वडिलांची भेट घेऊन त्यांच्याकडे त्यांच्या दिल्लीतील कोहिनूर मिलच्या व्यवसायात भागीदारी देण्याची मागणी केली. माझ्या वडिलांना आणि मला क्रिकेट व व्यवसाय यांना वेगळे ठेवायचे होते. त्यामुळे वडिलांनी लाला अमरनाथ यांना आपले भागीदार बनवण्यास नकार दिला. त्यानंतर लाला अमरनाथ काही वर्षे निवड समितीचे अध्यक्ष होते आणि मला पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही.

आजी-माजी क्रिकेटपटूंची आदरांजली

माधव आपटे सरांच्या खूप छान आठवणी आहेत. मी १४ वर्षांचा असताना मला त्यांच्याविरुद्ध शिवाजी पार्क येथे खेळण्याची संधी मिळाली. त्यांनी आणि डुंगारपूर सरांनी मला १५ वर्षांचा असताना सीसीआयसाठी खेळण्याची संधी दिली हे अजूनही आठवते. त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आणि मदत केली.
– सचिन तेंडुलकर

माधव आपटे सर यांचे निधन झाले, हे ऐकून मला धक्का बसला आहे. मी लहानपणापासून त्यांना ओळखत होतो आणि त्यांच्याकडे सल्ला मागायचो. त्यांनी मला नेहमी मार्गदर्शन केले आणि मला प्रोत्साहन दिले. मला आणि माझ्या वडिलांना त्यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळाली होती.
– विनोद कांबळी

फारशी संधी न मिळताही त्यांनी कसोटीत जवळपास ५० च्या सरासरीने धावा केल्या. ते वयाच्या ७१ व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळले. मुंबई आणि भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडूचे आज निधन झाले. माधव आपटे सर तुमची आठवण येत राहील.
– वसिम जाफर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -