घरक्रीडात्रिशतकवीर ईशांत!

त्रिशतकवीर ईशांत!

Subscribe

भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने नुकतेच कसोटी क्रिकेटमध्ये बळींचे त्रिशतक पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो भारताचा एकूण सहावा आणि केवळ तिसरा वेगवान गोलंदाज ठरला. दिल्लीकर ईशांतला २००७ मध्ये बांगलादेशविरुद्ध वयाच्या १८ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला २००८ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात. पर्थ येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत ईशांतने ऑस्ट्रेलियाचा तेव्हाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगविरुद्ध टाकलेला उत्कृष्ट स्पेल आजही प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला लक्षात आहे. 

भारतीय क्रिकेटला महान फलंदाज आणि उत्कृष्ट फिरकीपटू यांचा मोठा इतिहास आहे. परंतु, भारताला महान वेगवान गोलंदाज सातत्याने लाभलेले नाहीत. मागील काही वर्षांत मात्र यात बदल झाला आहे. विराट कोहलीने कर्णधारपद स्वीकारल्यापासून खासकरून वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीत मोठी सुधारणा झाली आहे. कोहलीच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करत कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. तसेच इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांना त्यांच्या घरच्या मैदानावर झुंज दिली.

भारताच्या या यशात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा या तेज त्रिकुटाची भूमिका अत्यंत महत्वाची होती. या तिघांमध्ये सर्वात अनुभवी म्हणजे ईशांत! त्यामुळे त्याच्यावर सर्वाधिक जबाबदारी असते असे म्हणणे वावगे ठरू नये. उंचपुऱ्या ईशांतने त्याची जबाबदारी चोख बजावली असून नुकतेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये बळींचे त्रिशतक पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो भारताचा एकूण सहावा आणि केवळ तिसरा वेगवान गोलंदाज ठरला.

- Advertisement -

जो खेळाडू सामन्यागणिक त्याच्या खेळात सुधारणा करतो, तोच संघात आपले स्थान टिकवून ठेवू शकतो, असे म्हटले जाते. दिल्लीकर ईशांतने त्याच्या खेळात आणि कामगिरीत सुधारणा करत केवळ कसोटी संघातील स्थान टिकवले नाही, तर ते अधिक बळकट केले आहे. सध्याच्या भारतीय कसोटी संघात ईशांत हा सर्वात अनुभवी खेळाडू असून त्याने सर्वाधिक ९८ सामने खेळले आहेत.

तेजतर्रार माऱ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ईशांतला २००७ मध्ये बांगलादेशविरुद्ध वयाच्या १८ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, तो प्रकाशझोतात आला आणि त्याची जगाला ओळख झाली ती २००८ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात. या दौऱ्यातील पर्थ येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत ईशांतने ऑस्ट्रेलियाचा तेव्हाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगविरुद्ध टाकलेला उत्कृष्ट स्पेल आजही प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला लक्षात आहे. तेव्हापासून ईशांतच्या कसोटी कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्याने सुरुवातीला झहीर खानसोबत भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळली.

- Advertisement -

२०१३ मध्ये ईशांतला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आणि त्याने कसोटी संघातील स्थानही गमावले. परंतु, त्याला संघात पुनरागमन करण्यासाठी फार वाट पाहावी लागली नाही. त्यानंतर मात्र ईशांतने मागे वळून पाहिले नाही. २०१४ मध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा दौरा केला. या दौऱ्यातील लॉर्ड्सवर झालेल्या कसोटीत ईशांत मॅचविनर ठरला. त्याने दुसऱ्या डावात ७४ धावांत ७ विकेट घेत कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. भारताने हा कसोटी सामना जिंकला आणि ईशांतने त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

ईशांतला एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये सातत्याने प्रभावी मारा करता आला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये मात्र त्याला यश मिळत राहिले. खासकरून २०१८ मध्ये बुमराहचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण झाल्यानंतर ईशांतची कामगिरी अधिकच बहरली. २०१८ वर्षात बुमराहने ९ कसोटी सामन्यांत ४८ विकेट घेतल्या आणि त्याला ईशांतने उत्तम साथ देत ११ कसोटीत ४१ बळी घेण्याची किमया साधली. तसेच त्याने कामगिरीत सातत्य राखत २०१९ मध्ये ६ कसोटीत २५ विकेट मिळवल्या.

नुकतेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये बळींचे त्रिशतक पूर्ण केले. भारताकडून याआधी अनिल कुंबळे (६१९), कपिल देव (४३४), हरभजन सिंग (४१७), रविचंद्रन अश्विन (३८७) आणि झहीर खान (३११) यांनी कसोटीत ३०० हून अधिक विकेट घेतल्या आहेत. ईशांतने आपल्या ९८ व्या कसोटीत या विक्रमाला गवसणी घातली. आता त्याला इंग्लंडविरुद्धच कसोटी सामन्यांचे शतक पूर्ण करण्याचीही संधी लाभू शकेल. ईशांतची आतापर्यंतची कामगिरी कौतुकास्पद असून तो पुढेही दमदार कामगिरी सुरु ठेवेल आणि आगामी काळात कसोटीत ४०० बळींचा टप्पा गाठेल ही आशा!

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -