नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा चौथा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघ आपल्या देशाच्या राष्ट्रगीतासाठी मैदानावर आले. मात्र यावेळी स्टेडियममध्ये एक मोठी चूक दिसून आली. स्टेडियममध्ये भारतीय राष्ट्रगीत वाजण्यास सुरुवात झाली. ‘जन-गण-मन’ वाजताच स्टेडियममध्ये अचानक गोंधळ उडाला. (Indian national anthem played at Gaddafi Stadium in Lahore during England vs Australia match)
नाणेफेक झाल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू, सामनाधिकारी, स्पर्धेचे शुभंकर राष्ट्रगीतासाठी मैदानात आले. तसेच दोन्ही संघांचा राष्ट्रध्वजही मैदानात आणण्यात आला. सामना पाहायला आलेले प्रेक्षकही राष्ट्रगीतासाठी उभे राहिले. सुरुवातीला इंग्लंड संघाचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचे राष्ट्रगीत वाजणे अपेक्षित होते. परंतु, चुकून काही सेंकदासाठी भारताचे राष्ट्रगीत ‘जण गण मन’, सुरू झाले आणि एकच गोंधळ झाला. चूक लक्षात येताच लगेच भारताचे राष्ट्रगीत बंद करून ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. मात्र काही सेंकदाची चूक हा सामना पाहाणाऱ्यांनी झटक्यात पकडली आणि भारतीय वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर पाकिस्तानला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Pakistan by mistakenly played Indian National Anthem during England Vs Australia #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/31D7hA6i6n
— hrishikesh (@hrishidev22) February 22, 2025
मांजर मैदानात शिरल्याने सामना थांबवावा लागला
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाबाबत पीसीबीच्या कार्यशैलीवर आतापर्यंत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शुक्रवारी अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात मैदानात मांजर आल्याने खेळ दोनदा थांबवावा लागला. कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. यानंतर आता भारतीय राष्ट्रगीत वाजल्यामुळे पीसीबीच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावरील युझर्स अशाप्रकारचे प्रश्न विचारत आहेत. तसेच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान प्लेलिस्टमध्ये भारतीय राष्ट्रगीत काय करत होते? असाही प्रश्न विचारला जात आहे.
इंग्लंडेचे ऑस्ट्रेलियासमोर 352 धावांचे आव्हान
सलामीवीर बेन डकेटच्या शानदार फलंदाजीमुळे इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर 352 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशुइसने इंग्लंडला सुरुवातीला दोन धक्के दिले, मात्र त्यानंतर बेन डकेट आणि जो रूटने तिसऱ्या विकेटसाठी 158 धावांची भागीदारी केली. डकेटने 143 चेंडूत 17 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 165 धावा केल्या. डकेटच्या खेळीच्या जोरावरच इंग्लंडने ५० षटकांत आठ गडी गमावून ३५१ धावा केल्या.