भारत आणि इंग्लंड या संघांमध्ये सध्या एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. भारताने या मालिकेची विजयी सुरुवात केली होती. मात्र, इंग्लंडने दमदार पुनरागमन करत दुसरा एकदिवसीय सामना ६ विकेट राखून जिंकला. त्यामुळे आता या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली असून तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी खेळला जाणार आहे. या मालिकेत २५ वर्षीय वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्याने पहिल्या दोन सामन्यांत मिळून ६ विकेट घेतल्या. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणात चार विकेट घेणारा तो भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला. त्याच्या या कामगिरीने भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर प्रभावित झाले आहेत. प्रसिधचा कसोटी संघासाठी विचार झाला पाहिजे, असे गावस्करांना वाटते.
कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी ठरेल
प्रसिध सिमचा चांगला वापर करतो. तो ज्याप्रकारे गोलंदाजी करत आहे ते पाहता, भारताच्या निवड समितीने त्याचा कसोटी संघासाठी विचार केला पाहिजे. जसप्रीत बुमराहने टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली होती. या कामगिरीच्या आधारे त्याची कसोटी संघात निवड झाली आणि आता तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारताचा प्रमुख गोलंदाज झाला आहे. प्रसिधच्या गोलंदाजीला चांगला वेग आहे आणि तो सिमचा योग्य वापरही करतो. त्यामुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी ठरेल याची मला खात्री आहे, असे गावस्कर म्हणाले.
सातत्याने सामने खेळण्याची संधी नाही
कर्नाटकाच्या प्रसिधने आतापर्यंत ९ प्रथम श्रेणी सामन्यांत ३४ गडी बाद केले आहेत. त्याने २०१५ मध्ये बांगलादेश ‘अ’ संघाविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि पहिल्याच डावात त्याने ४९ धावांत ५ विकेट घेतल्या. मात्र, कर्नाटकाकडे वेगवान गोलंदाजांचे बरेच पर्याय उपलब्ध असल्याने प्रसिधला सातत्याने प्रथम श्रेणी सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही.