IND vs ENG : पहिले सत्र भारतीय फिरकीपटूंच्या नावे; इंग्लंड ४ बाद ८१

अक्षर पटेलने दोन आणि रविचंद्रन अश्विनने एक विकेट घेतली.

ashwin, axar patel
रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात झाली. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत असलेल्या या डे-नाईट कसोटीच्या पहिल्या सत्रात भारताच्या फिरकीपटूंनी इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत टाकले. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने दोन आणि ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने एक विकेट घेतल्याने पहिल्या दिवशी चहापानाच्या वेळी इंग्लंडची ४ बाद ८१ अशी अवस्था होती. डे-नाईट कसोटीत पहिल्या सत्रानंतर २० मिनिटांचा ‘टी ब्रेक’ असतो. टी ब्रेक झाला त्यावेळी भारतीय संघ फ्रंटफूटवर होता. इंग्लंडकडून पहिल्या सत्रात सलामीवीर झॅक क्रॉलीने एकाकी झुंज देत ५३ धावांची खेळी केली.

क्रॉलीची एकाकी झुंज

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. इंग्लंडच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. ईशांत शर्माने डॉम सिबलीला खातेही न उघडता बाद केले. तसेच जॉनी बेअरस्टोही खाते उघडू शकला नाही. त्याला अक्षर पटेलने पायचीत पकडले. यानंतर जो रूटने काही चांगले फटके मारत १७ धावा केल्या. मात्र, त्याला अश्विनने पायचीत पकडत इंग्लंडला तिसरा झटका दिला. क्रॉलीने एकाकी झुंज देत ५३ धावांची खेळी केली. परंतु, त्यालाही अक्षरने पायचीत पकडले. त्यामुळे इंग्लंडची चहापानाला ४ बाद ८१ अशी अवस्था होती.