घरक्रीडा...तर पुढील सुनील छेत्री मिळणार कसा? - स्टिमॅक

…तर पुढील सुनील छेत्री मिळणार कसा? – स्टिमॅक

Subscribe

भारतीय फुटबॉल संघाने मागील काही वर्षांत आपल्या खेळात खूप सुधारणा केली आहे. परंतु, त्यांना अजूनही मोठे सामने जिंकण्यात आणि गोल करण्यात अपयश येत आहे. गोलची आवश्यकता असताना भारतीय संघ अजूनही ३५ वर्षीय स्ट्रायकर सुनील छेत्रीकडे वळत असल्याचे वारंवार पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती बदलायची असल्यास इंडियन सुपर लीग (आयएसएल) आणि आय-लीग या स्थानिक फुटबॉल स्पर्धांमधील परदेशी खेळाडूंची संख्या कमी झाली पाहिजे, असे मत भारताचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी व्यक्त केले.

आयएसएल आणि आय-लीग या स्पर्धांनी आशियाई फुटबॉल संघाच्या (एएफसी) नियमांचे अनुकरण केले पाहिजे. भारतातील स्पर्धांमध्ये प्रत्येक सामन्यात पाच परदेशी खेळाडूंना खेळण्याची परवानगी आहे. मात्र, एएफसीच्या नियमानुसार प्रत्येक सामन्यात चारच परदेशी खेळाडू खेळू शकतात. आशियातील सर्वच यशस्वी देश या नियमाप्रमाणे खेळाडू खेळवतात. त्यामुळेच त्यांच्याकडे राष्ट्रीय संघ निवडताना बरेच पर्याय उपलब्ध असतात. आपण स्थानिक स्पर्धांमध्ये परदेशी खेळाडूंची संख्या कमी केली नाही, तर आपल्याला पुढील सुनील छेत्री कसा मिळणार? एखादा खेळाडू जो स्थानिक स्पर्धेत स्ट्रायकर म्हणून खेळलेला नसेल, त्याला मी थेट आंतरराष्ट्रीय सामन्यात त्या जागेवर कसा खेळवू?, असा सवाल स्टिमॅक यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

भारतीय फुटबॉल संघ २०२६ वर्ल्डकपसाठी पात्र होऊ शकेल!

भारतीय फुटबॉल संघाला २०२२ विश्वचषकासाठी पात्र होता येणार नाही. मात्र, हा संघ २०२६ विश्वचषकासाठी पात्र होऊ शकेल, असे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांना वाटते. भारतीय फुटबॉलला जागे करायचे असल्यास, राष्ट्रीय संघाने यशस्वी होणे गरजेचे आहे. २०२६ विश्वचषकासाठी पात्र होण्याची आपल्याला चांगली संधी आहे. या विश्वचषकात ४८ देश खेळणार आहे, म्हणजेच आशियातून आणखी ४-५ देश या स्पर्धेसाठी पात्र होतील, असे स्टिमॅक म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -