Homeक्रीडाTeam India : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर भारतीय संघ अडकला ऑस्ट्रेलियात; काय आहे कारण?

Team India : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर भारतीय संघ अडकला ऑस्ट्रेलियात; काय आहे कारण?

Subscribe

सिडनी कसोटीत भारताचा 6 विकेट्सने पराभव झाला. महत्त्वाचे म्हणजे मालिकेतील शेवटचा सामना अवघ्या तीन दिवसात संपला. मात्र त्यानंतरही भारतीय संघ अद्याप मायदेशात परतलेला नाही. याचे कारण आता समोर आले आहे.

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका कांगारू संघाने 3-1 ने खिशात घातली. भारतीय संघाला दहा वर्षांनंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत पराभवाचा सामना करावा लागला. सिडनी कसोटीत भारताचा 6 विकेट्सने पराभव झाला. महत्त्वाचे म्हणजे मालिकेतील शेवटचा सामना अवघ्या तीन दिवसात संपला. मात्र त्यानंतरही भारतीय संघ अद्याप मायदेशात परतलेला नाही. याचे कारण आता समोर आले आहे. (Indian team stuck in Australia after Border-Gavaskar Trophy)

सिडनी येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेला सामना तीन दिवसात संपला त्यामुळे भारतीय संघाला सध्या ऑस्ट्रेलियातच राहावे लागत आहे. कारण सिडनी कसोटी 7 जानेवारीपर्यंत खेळवली जाणार होती. त्यामुळे भारतीय संघ तोपर्यंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. मात्र आता सामना लवकर संपला असला तरी भारतीय संघाला मायदेशी परत येण्यासाठी तिकीट मिळण्यास विलंब होत आहे. बीसीसीआय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी तिकिटांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहे.

भारतीय संघाचा 7700 किलोमीटरहून अधिकचा प्रवास

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील पहिला कसोटी 22 ते 26 नोव्हेंबर 2024 या काळात पर्थमध्ये खेळवला गेला. यानंतर भारतीय संघ सराव सामना खेळण्यासाठी 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 या काळात कॅनबेरा येथे गेला होता. मालिकेतील दुसरा कसोटी 6 ते 10 डिसेंबर या काळात ॲडलेडमध्ये, तिसरा कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर या काळात ब्रिस्बेनमध्ये, चौथा कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर या काळात मेलबर्नमध्ये आणि शेवटचा कसोटी सामना 3  ते 7 जानेवारी 2025 या काळात सिडनी येथे खेळवण्यात आला. या मालिकेदरम्यान भारतीय संघाने संपूर्ण ऑस्ट्रेलियात एकूण 7700 किलोमीटरहून अधिक प्रवास केला.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा निकाल

पहिली कसोटी : भारत 295 धावांनी विजयी
दुसरी कसोटी : ऑस्ट्रेलियाचा 10 विकेट्सने विजय
तिसरी कसोटी : अनिर्णित राहिली
चौथी कसोटी : ऑस्ट्रेलिया 184 धावांनी विजयी
पाचवी कसोटी : ऑस्ट्रेलिया 6 विकेट्स राखून विजयी