कोलंबो : भारतीय संघाने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवत तब्बल आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले आहे. श्रीलंकेने दिलेल्या 50 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना एकही फलंदाज बाद न होता सलामीला आलेल्या फलंदाजानीच ही धावसंख्या साकारून श्रीलंकेचा लाजीरवाणा पराभव केला. या सामन्यांत मोहम्मद सिराजने चांगली कामगिरी केली.(Indian team wins Asia Cup title for eighth time A humiliating defeat for Sri Lanka)
संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून असलेल्या आजच्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेने क्रिकेटरसिकांना निराश केले. कारण, प्रथम फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंका संघातील पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. अवघ्या 50 धावांत संपूर्ण संघ गडगडला. आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी चमत्कारिक कामगिरी दाखवली आहे. जेतेपद अबाधित ठेवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाच्या फलंदाजीची अवस्था अशी होईल, याचा विचार खुद्द संघानेही केला नसेल.
भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्या
50 धावांवर श्रीलंका संघ सर्वबाद झाला. वनडे क्रिकेटमधील ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्याला श्रीलंकेच्या कोणत्याही फलंदाजाकडे उत्तर नव्हते आणि संघाची फलंदाजी अवघ्या 15.2 षटकांत संपुष्टात आली. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेचा संघ भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआऊट झाला. यापूर्वी 2014 मध्ये टीम इंडियाविरुद्ध श्रीलंकेचा संपूर्ण संघ 58 धावांत गारद झाला होता. भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर श्रीलंकेचा एकही फलंदाज टिकू शकला नाही. परिस्थिती इतकी बिकट होती की, संघातील केवळ दोनच फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. त्याचवेळी पाच फलंदाज खाते न उघडताच तंबूत परतले.
हेही वाचा : दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेणार हेरॉन मार्क-2; सोडण्यात आले अत्याधुनिक ड्रोन
हिरो ठरला मोहम्मद सिराज
मोहम्मद सिराजने भारतासाठी अत्यंत घातक गोलंदाजी केली. त्याने 7 षटकात 21 धावा देत 6 बळी घेतले. सिराजने एका षटकात चार विकेट घेत श्रीलंकेचे कंबरडे मोडले. हार्दिक पांड्याने तीन आणि जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. त्यामुले श्रीलंकेचा संघ अवघ्या 50 धावांवर तंबूत परतला.
हेही वाचा : माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला सोडणार नाही म्हणत प्रेयसीचा प्रियकरावर चाकूहल्ला
असा गडगडला श्रीलंकेचा संघ
नाणेफेक जिंकून फलंदाजीला आल्यावर बुमराहने श्रीलंकेला पहिला धक्का दिला. त्याने पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कुसल परेराला (0) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर सिराजने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सलामीवीर पथुम निसांका (2), तिसऱ्या चेंडूवर सादिरा समरविक्रमा (0), चौथ्या चेंडूवर चरिथ असलंका (0) आणि सहाव्या चेंडूवर धनंजय डी सिल्वा (4) यांना पायचीत केले. . सिराजने सहाव्या षटकात कर्णधार दासून शनाका (0) आणि 12व्या षटकात कुसल मेंडिस (17) याला बाद केले. श्रीलंकेकडून मेंडिसने सर्वाधिक धावा केल्या. हार्दिक पंड्याने 16व्या षटकात प्रमोद मदुशन (1) आणि मथिशा पाथिराना (0) यांना बाद करून श्रीलंकेचा डाव गुंडाळला. दुशान हेमंथा 13 धावा करून नाबाद राहिला.