इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धा

डॉमिनिक थीमची फेडररवर मात

स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररवर मात करत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमने इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. थीमने फेडररचा ३-६, ६-३, ७-५ असा पराभव केला. त्यामुळे फेडररचे विक्रमी सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. तसेच हा थीमचा फेडररवरील ५ सामन्यातील तिसरा विजय होता.

जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या थीमसाठी या सामन्याची सुरुवात चांगली झाली नाही. तो पहिल्या सेटमध्ये ४-१ असा मागे पडला होता. यानंतर त्याने आपला खेळ सुधारला मात्र फेडररनेही चांगला खेळ सुरू ठेवत पहिला सेट ६-३ असा जिंकला, पण थीमने दमदार पुनरागमन करत दुसरा सेट ६-३ असा आपल्या नावे केला. त्यामुळे हा सामना तिसर्‍या आणि निर्णायक सेटमध्ये गेला. या सेटच्या ११ व्या गेममध्ये थीमने फेडररची सर्व्हिस मोडली आणि त्यानंतर आपली सर्व्हिस राखत त्याने हा सामना जिंकला.

काही दिवसांपूर्वीच फेडररने आपल्या कारकिर्दीतील १०० वे जेतेपद मिळवले होते. मात्र, त्याला ही स्पर्धा जिंकता आली नाही. हा सामना संपल्यानंतर थीम फेडररला गमतीत म्हणाला, मला वाटते की मी तुझे अभिनंदन करणे योग्य ठरणार नाही, कारण तू माझ्यापेक्षा ८८ जेतेपद जास्त मिळवली आहेत.