Maharashtra Assembly Election 2024
घरक्रीडाAsian Champions Trophy Hockey 2024 : चीनचा धुव्वा उडवत भारतीय महिलांनी तिसऱ्यांदा...

Asian Champions Trophy Hockey 2024 : चीनचा धुव्वा उडवत भारतीय महिलांनी तिसऱ्यांदा जिंकली ट्रॉफी

Subscribe

भारतीय हॉकी संघाने आज, बुधवारी (20 नोव्हेंबर) बिहारमधील राजगीर हॉकी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाविरुद्ध 1-0 असा विजय मिळवून महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे विजेतेपद पटकावले आहे.

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाने आज, बुधवारी (20 नोव्हेंबर) बिहारमधील राजगीर हॉकी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाविरुद्ध 1-0 असा विजय मिळवून महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे महिला हॉकी संघाने तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. (Indian women hockey team defeating China and win Asian Champions Trophy 2024 for the third time)

भारत आणि चीन यांच्यातील अंतिम सामना नालंदा येथील राजगीर येथील क्रीडा संकुलात सायंकाळी 5 वाजता सुरू झाला. दीपिकाने भारतीय महिला संघासाठी एकमेव गोल (31व्या मिनिटाला) केला आणि 11 गोलांसह ती स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारी खेळाडू ठरली. तिसऱ्या क्वार्टरच्या पहिल्याच मिनिटाला दीपिकाने भारतासाठी पहिला गोल केला, ज्यामुळे भारताला विजय मिळाला. पहिल्या आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये 30 मिनिटांच्या खेळात चायना संघाला एकही गोल करता आला नाही. यासह हॉकी रँकिंगमध्ये नवव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाने तिसऱ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. याशिवाय तीन वेळा विजेतेपद पटकावण्यात भारताने आता कोरिया प्रजासत्ताकसोबत बरोबरी साधली आहे. यापूर्वी 2016 आणि 2023 मध्ये भारताने विजेतेपद पटकावले आहे.

- Advertisement -

भारताकडून भक्कम बचाव

दरम्यान, सामन्याला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र पहिल्या आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये त्यांना यश आले नाही. विशेष म्हणजे भारताला दुसऱ्या क्वार्टरमध्ये सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण त्यांना एकाही पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. त्याचवेळी, पॅरिस 2024 ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या चीनने देखील दोन पेनल्टी कॉर्नर जिंकले, परंतु त्यांनाही एकाही संधीचा फायदा उठवता आला नाही. पहिल्या हाफच्या अखेरपर्यंत दोन्ही संघांनी आपले खाते उघडले नाही. मात्र भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करत आघाडी घेतली. तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाली आणि 31व्या मिनिटाला दीपिकाने या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केले. यानंतर भारतीय महिला संघाने आक्रमण सुरूच ठेवले आणि दुसरा गोल करण्याचा प्रयत्न केला. दीपिकाने पेनल्टी स्ट्रोकद्वारे गोल करण्याचा प्रयत्न केला, पण चीनच्या गोलरक्षकाने तो हाणून पाडला. यानंतर शेवटच्या क्वार्टरमध्ये भारतासोबत चीननेही गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या मात्र त्यांना यश आले नाही. अखेर चीनचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले.


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -