‘ते’ प्रश्न अजूनही निरुत्तरित!

भारतीय महिला क्रिकेट संघाला २०१७ एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत आणि २०१८ टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने पराभूत केले. सुरुवातीच्या सामन्यांत दमदार कामगिरी करणार्‍या भारताला अखेरच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे भारताच्या खेळाडू दबाव हाताळण्यात अपयशी ठरतात का?, त्यांना मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावण्यात अपयश येते का?, असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. या प्रश्नांची उत्तरे देण्याची भारताकडे संधी होती ती नुकत्याच ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये. मात्र, या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारत पराभूत झाला. त्यामुळे ‘ते’ प्रश्न अजूनही निरुत्तरित आहेत.

क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा असतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत या अपेक्षा केवळ पुरुष संघाकडून असायच्या. मात्र, हळूहळू महिला संघाने दमदार कामगिरी करत भारतीय क्रिकेट रसिकांचे लक्ष आपल्याकडे ओढवून घेतले. भारताला झुलन गोस्वामी, अंजुम चोप्रा, मिताली राज यांसारख्या महान महिला क्रिकेटपटू लाभल्या आहेत. परंतु, असे असतानाही पुरुष संघाच्या छायेतून बाहेर येण्यासाठी त्यांना अनेक वर्षे झटावे लागले. अखेर २०१७ मध्ये या संघाने अशी कामगिरी केली की, जिने भारतातील महिला क्रिकेटचे आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचे रुपडेच बदलून टाकले.

इंग्लंडमध्ये २०१७ साली झालेला एकदिवसीय वर्ल्डकप भारतीय महिला क्रिकेट संघाला वेगळी ओळख मिळवून देणारा ठरला. मिताली राजच्या नेतृत्वात भारताने या स्पर्धेत ७ पैकी ५ साखळी सामने जिंकत उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केला. या फेरीत त्यांच्यासमोर आव्हान होते ते बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे! ऑस्ट्रेलियाने साखळी सामन्यात भारतावर मात केली होती. त्यामुळे उपांत्य फेरीतही त्यांचेच पारडे जड मानले जात होते. परंतु, या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नाबाद १७१ धावांच्या वादळी खेळीने ऑस्ट्रेलियाच्या सर्व गोलंदाजांना निरुत्तरित केले. तिच्या झंझावातामुळे भारताने ४२ षटकांत ४ बाद २८१ अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव २४५ धावांत आटोपला आणि भारताने दुसर्‍यांदा एकदिवसीय वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली.

अंतिम फेरीत भारताचा सामना झाला तो यजमान इंग्लंडशी! लॉर्ड्सवर झालेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडला ५० षटकांत ७ बाद २२८ धावांवर रोखले. याचा पाठलाग करताना भारत ४३ व्या षटकात ३ बाद १९१ असा सुस्थितीत होता. भारतीय संघ इतिहास रचणार असे वाटत असतानाच त्यांनी अवघ्या २८ धावांतच ७ विकेट गमावल्या. त्यामुळे भारताचा डाव २१९ धावांवर आटोपला आणि इंग्लंडने ९ धावांची सामना जिंकत चौथ्यांदा वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. भारताचा हा पराभव जिव्हारी लागणारा ठरला, केवळ खेळाडूंसाठीच नाही, तर चाहत्यांसाठीही! आपला संघ पराभूत झाला याचे चाहत्यांना दुःख होते आणि हा महिला संघासाठी खर्‍या अर्थाने विजय होता. मात्र, चाहते मिळवणे एक आणि ते टिकवणे वेगळे. त्यामुळे आता या संघाची खरी परीक्षा होती.

भारताच्या महिला या आव्हानासाठी तयार होत्या. वर्ल्डकपनंतर त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी सुरु ठेवली. पुढील वर्षीच म्हणजे २०१८ साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्येही त्यांनी दमदार कामगिरी केली. कर्णधार हरमनप्रीत (५ सामन्यांत १८३) आणि स्मृती मानधना (५ सामन्यांत १७८) यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारताने या स्पर्धेत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांवर मात करत उपांत्य फेरी गाठली. या फेरीत त्यांच्यासमोर पुन्हा इंग्लंडचे आव्हान होते. या सामन्यात भारताच्या फलंदाज सपशेल अपयशी ठरल्या. भारताचा डाव केवळ ११२ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडने ११३ धावांचे आव्हान २ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण करत अंतिम फेरी गाठली. त्यामुळे भारताच्या खेळाडू दबाव हाताळण्यात अपयशी ठरतात का?, त्यांना मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावण्यात अपयश येते का?, असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. या प्रश्नांची उत्तरे देण्याची भारताकडे संधी होती ती नुकत्याच ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये.

हरमनप्रीतच्या संघाने सलामीच्या सामन्यात यजमानांना पराभवाचा धक्का दिला आणि पुढील तीनही साखळी सामने जिंकत आपण हा वर्ल्डकप जिंकण्यासाठी दावेदार असल्याचे दाखवून दिले. या स्पर्धेत भारताची १६ वर्षीय सलामीवीर शेफाली वर्माने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले. तिने या स्पर्धेच्या चार साखळी सामन्यांत १५५ हून अधिकच्या स्ट्राईक रेटने १६१ धावा केल्या. त्यामुळे भारताने अगदी सहजपणे उपांत्य फेरीत प्रवेश केला. या फेरीत पुन्हा भारताचा सामना होता तो इंग्लंडशी! मागील दोन वर्ल्डकपमधील पराभवांची परतफेड करण्याची भारताला ही चांगली संधी होती. मात्र, पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही. आपले चारही साखळी सामने जिंकल्याचा भारताला फायदा झाला आणि त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम फेरीत भारताचा सामना यजमान ऑस्ट्रेलियाशी झाला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर ८६ हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने झालेल्या या सामन्यात अलिसा हिली (३९ चेंडूत ७५) आणि बेथ मुनी (५४ चेंडूत नाबाद ७८) या सलामीच्या जोडीच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने २० षटकांत १८४ धावा केल्या. याचा पाठलाग करताना शेफाली आणि मानधना यांच्याकडून भारताला दमदार सुरुवातीची गरज होती. “मला भारताच्या सलामीच्या जोडीला गोलंदाजी करायला अजिबातच आवडत नाही”, असे विधान सामन्याआधी ऑस्ट्रेलियाची गोलंदाज मेगन शूटने केले होते. मात्र, तिने पहिल्याच षटकात शेफालीला बाद करत भारताला मोठा झटका दिला. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, मग ते पुरुष असो वा महिला, ’माईंड गेम’ खेळण्यात पटाईत असतात, हे यावरून दिसून आले. मानधना आणि हरमनची बॅट अंतिम सामन्यातही शांत राहिली. त्यामुळे भारताचा डाव अवघ्या ९९ धावांतच आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा महिला टी-२० वर्ल्डकप जिंकला.

भारतीय महिला संघाच्या कामगिरीत सामन्यागणिक सुधारणा होत आहे. परंतु, हा संघ अजूनही दबावाच्या परिस्थितीत सर्वोत्तम खेळ करण्यात अपयशी ठरतो हे पुन्हा दिसून आले. हा संघ मागील तीन वर्ल्डकपमध्ये सुवर्ण क्षणाची वाट पाहत आहे. “आम्ही पराभूत झालो असलो तरी आमचा संघ योग्य मार्गावर आहे”, असे हरमन म्हणाली. तिचा हा विश्वास संघातील खेळाडू सार्थ ठरवून लवकरच वर्ल्डकपवर भारताचे नाव कोरण्याची ऐतिहासिक कामगिरी करतील ही आशा!