Indonesia Masters 2021: पी.व्ही सिंधूनंतर किदाम्बी श्रीकांतचा पण उपांत्य फेरीत पराभव; भारताचे आव्हान संपुष्टात

पी.व्ही सिंधूनंतर किदाम्बी श्रीकांतला देखील उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला

इंडोनेशियाच्या मास्टर्स बॅडमिंडनच्या ओपनमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. पी.व्ही सिंधूनंतर किदाम्बी श्रीकांतला देखील उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. महिलांच्या एकेरी स्पर्धेत झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सिंधूचा जपानच्या अकाने यामागुचीने सरळ सेटमध्ये पराभव केला. सिंधूच्या पराभवासोबतच यामागुचीने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सिंधूच्या पराभवाने भारताच्या अपेक्षेला मोठा धक्का बसला. दरम्यान किदाम्बी श्रीकांतचा देखील दारूण पराभव झाल्याने भारताचे स्पर्धेतील आव्हान पूर्णत: संपुष्टात आले.

उपांत्य फेरीच्या सामन्यात तिसऱ्या मानांकित पी.व्ही सिंधूला तिच्या क्षमतेनुसार खेळी करता आली नाही. दरम्यान ती तिची सर्वोत्तम कामगिरी करण्यात देखील अपयशी ठरली. सिंधू सुरुवातीपासूनच दोन्हीही सेटमध्ये पिछाडीवर होती बदल्यात तिला पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूला काही वेळ आघाडी मिळवता आली तेव्हा असे वाटत होते की सिंधू पुनरागमन करून प्रतिस्पर्धी यामागुचीला चांगली टक्कर देईल. मात्र असे झाले नाही दुसऱ्या सेटमध्ये देखील चांगली खेळी करून यामागुचीने २१-९ अशा अंतराने विजय मिळवला. ३२ मिनिटे सुरू असलेल्या या सामन्यात जपानच्या खेळाडूने सिंधूला सरळ सेटमध्ये २१-१३, २१-९ अशा मोठ्या फरकाने पराभूत केले.

श्रीकांतचा दारूण पराभव

पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत किदाम्बी श्रीकांतला पराभवाचा सामना करावा लागला. त्याला डेन्मार्कच्या तिसऱ्या मानांकित अँडर्स अँटोन्सेनने २१-१४, २१-९ अशा मोठ्या फरकाने चितपट केले. श्रीकांतने पहिल्या सेटमध्ये अँटोनसेनला काही अंशत: टक्कर देण्याचा प्रयत्न केला पण तो काही जास्त वेळ त्याचा सामना करू शकला नाही बदल्यात अँटोनसने त्याला सरळ सेटमध्ये पराभूत करून बाहेरचा रस्ता दाखवला.


हे ही वाचा: IPL 2022 : धोनी पुढची आयपीएल खेळणार?, त्यानेच दिली माहिती म्हणाला…