घरक्रीडापृथ्वी शॉ फिट!

पृथ्वी शॉ फिट!

Subscribe

प्रशिक्षक रवी शास्त्रींची माहिती

भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉला डाव्या पायाला सूज आल्यामुळे गुरुवारी झालेल्या सराव सत्राला मुकावे लागले. त्यामुळे शनिवारपासून सुरु होणार्‍या न्यूझीलंडविरुद्ध दुसर्‍या कसोटीसाठी त्याच्या उपलब्धतेबाबत शंका होती. मात्र, पृथ्वी फिट असून या सामन्यात दमदार कामगिरी करण्यास सज्ज आहे, अशी माहिती भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला दिली.

ख्राईस्टचर्चला होणार्‍या दुसर्‍या कसोटीआधी भारतीय संघाने शुक्रवारी कसून सराव केला. पृथ्वीही नेट्समध्ये घाम गळताना दिसला. त्याच्या फलंदाजीवर प्रशिक्षक शास्त्री लक्ष ठेऊन होते. तसेच तो नेट्समधून बाहेर आल्यावर कर्णधार विराट कोहलीने त्याच्याशी संवाद साधला. रोहित शर्मा या मालिकेत खेळू न शकल्याने पृथ्वीला कसोटी संघात पुनरागमनाची संधी मिळाली. मात्र, पहिल्या कसोटीत त्याला या संधीचा फारसा उपयोग करता आला नाही. या कसोटीच्या पहिल्या डावात टीम साऊथीने १६ धावांवर त्याचा त्रिफळा उडवला, तर दुसर्‍या डावात ट्रेंट बोल्टने उसळी घेतलेला चेंडू टाकत त्याला १४ धावांवर बाद केले. त्यामुळे दुसर्‍या कसोटीत चांगली कामगिरीचा त्याचा प्रयत्न असेल.

- Advertisement -

…म्हणून साहाच्या जागी पंत!

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत यष्टीरक्षक म्हणून वृद्धिमान साहाच्या जागी रिषभ पंतला संधी देण्याचा निर्णय घेतला. भारतामध्ये झालेल्या मागील काही सामन्यांत साहाने यष्टिरक्षणाची धुरा सांभाळली होती. त्यामुळे पंतचे संघात पुनरागमन झाल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले. पंतच्या समावेशाबाबत प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले, भारतामध्ये खेळपट्ट्या फिरकीपटूंना अनुकूल असतात. चेंडू खूप वळतो. त्यामुळे तुम्हाला अनुभवी यष्टिरक्षकाची गरज असते आणि साहा सर्वोत्तम यष्टिरक्षकांपैकी एक आहे. मात्र, इथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळते आणि यष्टिरक्षकाने चांगली फलंदाजी करणे आवश्यक होते. त्यातच पंत डावखुरा फलंदाज आहे, जो आक्रमक फलंदाजी करतो. त्यामुळे आम्ही त्याला संधी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -