IPL 2019 Final: मुंबईच सुपर किंग्ज

Mumbai indians wins ipl 2019

जसप्रीत बुमराहच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा एका धावेने पराभव करत आयपीएलचे जेतेपद पटकावले. हे मुंबईचे विक्रमी चौथे जेतेपद होते. तर, तीन वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नईची अंतिम सामन्यात हरण्याची ही पाचवी वेळ होती. मुंबईने दिलेल्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची चांगली सुरुवात केली. फॅफ डू प्लेसिस आणि शेन वॉटसन या अनुभवी खेळाडूंनी ३३ धावांची सलामी दिल्यानंतर डू प्लेसिसला (२६) कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर डी कॉकने यष्टिचित केले. पुढे सुरेश रैना (८), अंबाती रायडू (१) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (२) यांना फारकाळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. त्यामुळे चेन्नईची १३व्या षटकात ४ बाद ८२ अशी अवस्था होती.

मात्र, दुसऱ्या बाजूने वॉटसनने चांगली फलंदाजी सुरु ठेवत ४४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानेच कृणाल टाकत असलेल्या १८व्या षटकात ३ षटकारांसह २० धावा चोपून काढल्या. बुमराहने पुढच्या षटकात ब्रावोला (१५) बाद करत या सामन्यात पुन्हा रंगत आणली. मलिंगाने टाकलेल्या अखेरच्या षटकात चेन्नईला ९ धावांची गरज असताना चौथ्या चेंडूवर कृणालने वॉटसनला (८०) धावचीत केले. यानंतर अखेरच्या चेंडूवर चेन्नईला २ धावांची गरज असताना मलिंगाने शार्दूलला पायचीत करत मुंबईला विजय मिळवून दिला.

त्याआधी मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचे सलामीवीर क्विंटन डी कॉक (२९) आणि कर्णधार रोहित शर्मा (१५) यांनी आक्रमक सुरुवात करत चौथ्या षटकातच ४५ धावा फलकावर लावल्या. मात्र, शार्दूल ठाकूरने डी कॉकला बाद करत ही जोडी फोडली, तर पुढच्याच षटकात दीपक चहरच्या गोलंदाजीवर रोहित माघारी परतला. यानंतर सूर्यकुमार यादव (१५) आणि ईशान किशन (२३) यांनी काही काळ संयमाने फलंदाजी केली. परंतु, इम्रान ताहिरने या दोघांनाही आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. या दोन विकेटमुळे ताहिर यंदा या स्पर्धेत सर्वाधिक विकेट (२६) घेणारा गोलंदाज बनला. अखेरच्या षटकांत किरॉन पोलार्ड (नाबाद ४१) आणि हार्दिक पांड्या (१६) यांनी चांगली फटकेबाजी केल्यामुळे मुंबईने २० षटकांत ८ विकेट गमावत १४९ इतकी धावसंख्या उभारली. चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक ३, तर ताहिर आणि ठाकूर यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.