घरIPL 2020IPL 2020 : 'हा' आमच्यासाठी धडा होता; कोलकाता सामन्यानंतर रोहितचे विधान 

IPL 2020 : ‘हा’ आमच्यासाठी धडा होता; कोलकाता सामन्यानंतर रोहितचे विधान 

Subscribe

रोहित बाद झाला तेव्हा मुंबईचा संघ ४ बाद १७७ असा सुस्थितीत होता.

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएल मोसमातील पहिला विजय मिळवण्यात यश आले. त्यांना सलामीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, कोलकाताविरुद्ध मुंबईच्या संघाने उत्कृष्ट खेळ केला. खासकरून कर्णधार रोहित शर्माने अप्रतिम फलंदाजी करत ५४ चेंडूत ८० धावांची खेळी केली आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला. १८ व्या षटकात रोहित बाद झाला तेव्हा मुंबईचा संघ ४ बाद १७७ असा सुस्थितीत होता. चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मात्र मुंबईच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नव्हती. त्यामुळे कोलकाताविरुद्धच्या सामन्यात आम्हाला धडा मिळाला असे रोहित म्हणाला.

मोठी खेळी करणे अवघड

इथे वातावरण खूप उष्ण आहे. त्यामुळे खेळपट्टीवर खूप वेळ राहणे आणि मोठी खेळी करणे अवघड आहे. मोठी खेळी करताना फलंदाज म्हणून तुमच्यातील ऊर्जा निघून जाते. अखेरच्या काही षटकांमध्ये मला थकवा जाणवत होता. मात्र, आमच्यासाठी हा धडा होता. चेन्नईविरुद्ध सलामीच्या सामन्यात आमच्याकडून कोणीही मोठी खेळी केली नाही. या सामन्यात मला खेळपट्टीवर वेळ घालवण्यात यश आले. आपण याआधीही हे पाहिले आहे. आमचा एक फलंदाज अखेरपर्यंत टिकतो, तेव्हा आम्ही सहसा विजयी होतो. या सामन्यात मी तेच करण्याचा प्रयत्न केला, असे सामन्यानंतर रोहित म्हणाला. आयपीएलमध्ये आता कोलकाताविरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम रोहितच्या नावे झाला आहे. त्याने या संघाविरुद्ध आतापर्यंत ८७५ धावा केल्या आहेत.

- Advertisement -

गोलंदाजांनी केले प्रभावित

कोलकाताविरुद्धच्या या सामन्यात मुंबईच्या चार खेळाडूंनी २-२ गडी बाद केले. गोलंदाजांच्या कामगिरीने कर्णधार रोहितला प्रभावित केले. आम्ही संघ निवडला होता, तो वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टी लक्षात घेऊन. यंदा आयपीएल युएईत होईल अशी कोणाला अपेक्षा नव्हती. मात्र, इथे सुरुवातीच्या काही षटकांत चेंडू स्विंग होतो आणि याचा आमच्या गोलंदाजांनी चांगला उपयोग केला. ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सन यंदा पहिल्यांदाच आमच्या संघाकडून खेळत आहेत. मात्र, तेसुद्धा दमदार कामगिरी करत असल्याचा आनंद आहे, असे रोहितने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -