घरक्रीडाऑस्ट्रेलियाला त्यांचेच क्रिकेटपटू परके?

ऑस्ट्रेलियाला त्यांचेच क्रिकेटपटू परके?

Subscribe

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारतातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हणत १५ मेपर्यंत हवाई वाहतूक स्थगित केली होती. तसेच आयपीएलमध्ये खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी स्वतःच सोय करावी लागणार असल्याचेही ते म्हणाले होते. आयपीएल स्पर्धेत सर्वच खेळाडू बायो-बबलमध्ये राहत असून त्यांची सातत्याने कोरोना चाचणी होते. असे असतानाही ऑस्ट्रेलियन सरकारने या खेळाडूंना निर्बंधांमधून सूट दिलेली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला त्यांचेच क्रिकेटपटू परके झाले आहेत का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

‘भारतात असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि इतर सदस्यांच्या मायदेशी परतण्यावरून ऑस्ट्रेलियन सरकारने काही विधाने केली आहेत. त्यामुळे आमचे लक्ष थोडे विचलित झाले आहे यात शंका नाही. मात्र, आम्ही मायदेशी कसे परतणार, याची आम्हाला चिंता नाही. भारतात जी परिस्थिती आहे, त्याच्या तुलनेत आम्ही मायदेशी कसे परतणार ही समस्या खूपच छोटी आहे,’ हे शब्द होते ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि सध्या आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षकपद भूषवणाऱ्या रिकी पॉन्टिंगचे. आपल्याच देशाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची कानउघडणी करण्याचा पॉन्टिंगचा हा प्रयत्न होता.

मागील आठवड्यात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यांनी भारतातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हणत हवाई वाहतूक स्थगित केली होती. ऑस्ट्रेलियामध्ये भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांना १५ मेपर्यंत प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा मॉरिसन यांनी केली. त्यावेळी त्यांना आयपीएलमध्ये खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंविषयी विचारणा झाली. हवाई वाहतुकीवरील बंदी कायम राहिल्यास ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी कसे परतणार? असा प्रश्न त्यांना विचारला गेला. यावर त्यांचे उत्तर ऐकून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना धक्का बसला असणार यात शंका नाही.

- Advertisement -

‘आयपीएल स्पर्धेत खेळणारे ऑस्ट्रेलियन खेळाडू स्वतः भारतात गेले आहेत. हा ऑस्ट्रेलियन संघाचा दौरा नाही. ते त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी तिथे गेले असून त्यांना पुन्हा मायदेशी परतण्यासाठी स्वतःच सोय करावी लागेल,’ असे मॉरिसन म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर अँड्र्यू टाय, केन रिचर्डसन आणि अ‍ॅडम झॅम्पा या तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएलच्या उर्वरित मोसमातून माघार घेत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. परंतु, आयपीएलमध्ये अजूनही १४ ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळत असून यात डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार पॅट कमिन्स अशा प्रमुख खेळाडूंचाही समावेश आहे.

यंदा भारतात सुरु असलेल्या आयपीएलचे साखळी सामने हे २३ मे रोजी संपणार असून अंतिम सामना ३० मे रोजी खेळला जाणार आहे. त्यामुळे हवाई वाहतुकीवरील बंदी १५ मेनंतरही कायम राहिल्यास ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना मायदेशी परतण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकेल. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला त्यांचेच क्रिकेटपटू परके झाले आहेत का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

- Advertisement -

एका रिपोर्टनुसार, सध्या ९ हजार ऑस्ट्रेलियन नागरिक विविध कारणांसाठी भारतामध्ये आहेत. पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनंतर यापैकी बऱ्याच जणांनी ऑस्ट्रेलियात परतण्याचा प्रयत्न केला. परंतु, ऑस्ट्रेलियन सरकारने आपल्याच नागरिकांना भारतातून मायदेशी परतण्यास मनाई केली आहे. मागील १४ दिवसांपासून भारतात वास्तव्यास असलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना देशात परतण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच नियम मोडल्यास त्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून हजारोंचा दंड आणि थेट ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकेल.

या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात येते की, ऑस्ट्रेलियन सरकारने सामान्य नागरिक आणि क्रिकेटपटू यांच्यात भेदभाव केलेला नाही. सर्वांना समान वागणूक आणि सर्वांसाठी समान कायदे, ही गोष्ट एरवी योग्य असली तरी सध्याची परिस्थिती मात्र वेगळी आहे. ऑस्ट्रेलियाचे सर्वसामान्य नागरिक, जे भारतात पर्यटनासाठी आले आहेत, ते अनेक ठिकाणी फिरले असणार, अनेकांशी त्यांचा संपर्क आला असणार. त्यामुळे भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या लोकांना ऑस्ट्रेलियात प्रवेश न देणे, हा निर्णय योग्यच आहे. मात्र, आयपीएलमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची गोष्ट वेगळी आहे.

आयपीएल स्पर्धेत सर्वच खेळाडू बायो-बबलमध्ये (जैव-सुरक्षित वातावरण) राहत आहेत. याचाच अर्थ, हे खेळाडू हॉटेलमधून बसने स्टेडियममध्ये जातात. सामना खेळतात किंवा सराव करतात आणि पुन्हा त्याच बसने स्टेडियममधून हॉटेलमध्ये परत येतात. त्यामुळे त्यांचा बाहेरील व्यक्तींशी संबंध येत नाही. तसेच हे खेळाडू राहत असलेल्या हॉटेलमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश नाही. या खेळाडूंची सातत्याने कोरोना चाचणी होते.

मग असे असतानाही आपल्याच खेळाडूंना पुन्हा मायदेशी परत येऊ न देण्याचा आणि त्यांच्यासाठी वेगळे नियम न करण्याचा ऑस्ट्रेलियन सरकारचा निर्णय योग्य आहे का? क्रिकेट हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय खेळ असून क्रिकेटपटूंना खूप मान दिला जातो. परंतु, आता ऑस्ट्रेलियन सरकार वॉर्नर आणि स्मिथसारख्या मोठ्या खेळाडूंसह आयपीएलमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या पॉन्टिंग, तसेच या स्पर्धेत समालोचन करणाऱ्या ब्रेट लीसारख्या माजी क्रिकेटपटूंना जी वागणूक देत आहे, त्याने जगासमोर फारसे चांगले चित्र उभे राहत नाही, हे निश्चित.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -