IPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्यासाठी स्वतःच सोय करावी; पंतप्रधान मॉरिसन यांनी केले स्पष्ट

ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या सर्व प्रवासी विमानांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Australians players in IPL will have to make their own arrangements to return home
ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्यासाठी स्वतःच सोय करावी; पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी केले स्पष्ट

भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर, आता ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या सर्व प्रवासी विमानांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होणे हा चिंतेचा विषय असून ऑस्ट्रेलियामध्ये भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांना १५ मेपर्यंत प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मंगळवारी केली. आता हा बंदीचा कालावधी वाढल्यास आयपीएल स्पर्धेत खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित होतो. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी स्वतःच सोय करावी लागणार असल्याचे मॉरिसन यांनी स्पष्ट केले. यंदाच्या आयपीएलची ३० मे रोजी सांगता होईल.

हा ऑस्ट्रेलियन संघाचा दौरा नाही

आयपीएल स्पर्धेत खेळणारे ऑस्ट्रेलियन खेळाडू स्वतः खर्च करून भारतात गेले आहेत. हा ऑस्ट्रेलियन संघाचा दौरा नाही. ते त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी तिथे गेले असून त्यांना पुन्हा मायदेशी परतण्यासाठी स्वतःच सोय करावी लागेल, असे मॉरिसन म्हणाले. भारतात कोरोनाचा धोका वाढत असल्याने अँड्र्यू टाय, केन रिचर्डसन आणि अ‍ॅडम झॅम्पा या तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी उर्वरित मोसमातून माघार घेत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मानले आभार 

आयपीएलमध्ये अजूनही १४ ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळत असून यात डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स अशा प्रमुख खेळाडूंचाही समावेश आहे. तसेच मॅथ्यू हेडन, ब्रेट ली, मायकल स्लेटर आणि लिसा स्थळेकर हे आयपीएलमध्ये समालोचन करण्यासाठी म्हणून भारतात आहेत. बीसीसीआय आणि आयपीएल या खेळाडू व समालोचकांची काळजी घेत असल्याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांचे आभार मानले आहेत.