IPL 2021 : यंदा आवेश खान, चेतन साकारियाने केले प्रभावित! माजी क्रिकेटपटूने केले कौतुक    

भारताचे काही युवा वेगवान गोलंदाज दमदार कामगिरी करताना दिसले. 

aavesh khan and chetan sakariya
आवेश खान आणि चेतन साकारिया 

कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव केल्याने मागील आठवड्यात इंडियन प्रीमियर लीग (IPL) यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. परंतु, त्याआधी झालेल्या २९ सामन्यांमध्ये काही संघांनी आणि खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी कामगिरी केली. यंदा भारताचे काही युवा वेगवान गोलंदाज दमदार कामगिरी करताना दिसले. भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राला राजस्थान रॉयल्सचा चेतन साकारिया, दिल्ली कॅपिटल्सचा आवेश खान आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हर्षल पटेल या नवख्या भारतीय गोलंदाजांनी सर्वाधिक प्रभावित केले.

भारतीय गोलंदाजांची भूमिका बदलली

यंदा आयपीएलचे फार सामने होऊ शकले नाहीत. त्यामुळे कोणत्याही खेळाडूविषयी मत बनवणे अवघड आहे. परंतु, आता युवा भारतीय गोलंदाजांची भूमिका बदलली आहे, हे नक्की. चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यांत बंगळुरूने हर्षल पटेलला त्याची चारही षटके डावाच्या उत्तरार्धात (अखेरच्या १० षटकांत) टाकण्याची जबाबदारी दिली होती. चेतन साकारियाने राजस्थानसाठी नव्या चेंडूने आणि अखेरच्या षटकांतही गोलंदाजी केली. तसेच दिल्लीसाठी आवेश खानने जेव्हा गोलंदाजी करण्याची संधी मिळेल, तेव्हा त्या संधीचे सोने केले. त्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील २९ सामन्यांत मला या तीन भारतीय वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक प्रभावित केले, असे चोप्रा म्हणाला.

हर्षल पटेलच्या सर्वाधिक विकेट

यंदा सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये हर्षल पटेल (७ सामन्यांत १७ विकेट) अव्वल स्थानावर, तर आवेश (८ सामन्यांत १४ विकेट) तिसऱ्या स्थानावर राहिला. तसेच साकारियाला राजस्थानसाठी ७ सामन्यांत ७ विकेट घेण्यात यश आले. तसेच त्याने महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांसारख्या फलंदाजांनाही बाद केले होते.