घरक्रीडाIPL 2021 : बेन स्टोक्स स्पर्धेतून आऊट! राजस्थान घेऊ शकेल 'या' खेळाडूंना...

IPL 2021 : बेन स्टोक्स स्पर्धेतून आऊट! राजस्थान घेऊ शकेल ‘या’ खेळाडूंना संघात 

Subscribe

स्टोक्सच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेला नुकतीच सुरुवात झाली असून राजस्थान रॉयल्सला मोठा झटका बसला आहे. त्यांचा इंग्लिश अष्टपैलू बेन स्टोक्स दुखापतीमुळे उर्वरित मोसमाला मुकणार आहे. यंदाच्या मोसमात राजस्थानचा सलामीचा सामना पंजाब किंग्सविरुद्ध झाला. या सामन्यात क्रिस गेलचा झेल पकडताना स्टोक्सच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे आता उर्वरित स्पर्धेत खेळता येणार नसल्याचे राजस्थान रॉयल्सने घोषित केले. मात्र, स्टोक्स स्पर्धेत खेळू शकणार नसला, तरी तो भारतातच थांबणार असून संघाला मदत करणार आहे. तसेच त्याची जागा घेण्यासाठी कोणत्या खेळाडूला आम्हाला संघात घेता येऊ शकेल याचा विचार करत असल्याचे राजस्थानकडून सांगण्यात आले.

या खेळाडूंचा पर्याय – 

डेवॉन कॉन्वे (न्यूझीलंड) : न्यूझीलंडचा डावखुरा फलंदाज डेवॉन कॉन्वेने मागील काही काळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यंदाच्या खेळाडू लिलावात कॉन्वेला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. मात्र, त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात नाबाद ९९ धावांची खेळी केली. कॉन्वेने न्यूझीलंडकडून आतापर्यंत १४ टी-२० सामन्यांत चार अर्धशतकांच्या मदतीने ४७३ धावा केल्या असून राजस्थान त्याला संघात घेण्याचा विचार करू शकेल.

- Advertisement -

थिसारा परेरा (श्रीलंका) : राजस्थानला स्टोक्सची जागा घेण्यासाठी अष्टपैलू खेळाडू हवा असल्यास ते श्रीलंकेच्या थिसारा परेराला पसंती देऊ शकतील. परेराला ३७ आयपीएल सामन्यांचा अनुभव आहे. मात्र, यंदाच्या खेळाडू लिलावात त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. परेराने नुकतेच एका स्थानिक सामन्यात सहा चेंडूत सहा षटकार मारले होते. त्याच्यात फटकेबाजी करण्याची क्षमता असून तो चांगली गोलंदाजीही करतो.

अ‍ॅरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) : स्टोक्स पंजाबविरुद्ध सलामीला आला होता. त्यामुळे स्टोक्सची जागा घेण्यासाठी राजस्थान सलामीवीराला संघात घेण्याचा विचार करू शकेल. त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचचा पर्याय आहे. फिंचला आरसबीकडून खेळताना आयपीएलच्या मागील मोसमात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. मात्र, त्यानंतर त्याने न्यूझीलंडविरुद्ध मॅचविनिंग खेळी केली.

- Advertisement -

अ‍ॅलेक्स हेल्स (इंग्लंड) : इंग्लंडचा सलामीवीर अ‍ॅलेक्स हेल्सला मागील काही काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळालेली नाही. मात्र, त्याने ऑस्ट्रेलियातील टी-२० स्पर्धा बिग बॅश लीगमध्ये दमदार खेळ केला. त्याने सिडनी थंडरकडून खेळताना सर्वाधिक ५४३ धावा केल्या. त्यामुळे आता त्याला राजस्थानचा संघ आयपीएलमध्ये खेळण्याची संधी देऊ शकेल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -