घरक्रीडाIPL 2021 : बायो-बबलचा फुगा फुटला; आयपीएलमध्ये कोरोनाची एंट्री!

IPL 2021 : बायो-बबलचा फुगा फुटला; आयपीएलमध्ये कोरोनाची एंट्री!

Subscribe

कोलकाताचे दोन खेळाडू, चेन्नईचे तीन सदस्य पॉझिटिव्ह सापडले आहेत. 

भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, देशात अशी परिस्थिती असतानाही बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा घाट घातला. आयपीएल स्पर्धा बायो-बबलमध्ये (जैव-सुरक्षित वातावरण) सुरु असल्याने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे सदस्य पूर्णपणे सुरक्षित आहेत, असा बीसीसीआयला विश्वास होता. मात्र, बीसीसीआयचा हा विश्वास फोल ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या वरूण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या दोन खेळाडूंना, तसेच चेन्नई सुपर किंग्स संघाच्या तीन सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

कोलकाता-बंगळुरू सामना लांबणीवर 

सोमवारी (काल) कोलकाता आणि बंगळुरू यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना रंगणार होता. परंतु, कोलकाताच्या खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचे समजल्यावर बीसीसीआयला हा सामना पुढे ढकलणे भाग पडले. ‘कोलकाता विरुद्ध बंगळुरू हा सामना लांबणीवर पडला आहे. वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या कोलकाताच्या दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे. मागील चार दिवसांत झालेल्या कोरोना चाचणीच्या तिसऱ्या फेरीत त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला,’ असे आयपीएलकडून सांगण्यात आले. या दोघांव्यतिरिक्त कोलकाताच्या सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

- Advertisement -

चेन्नईच्या तीन सदस्यांना कोरोना

तसेच चेन्नई सुपर किंग्स संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बसची साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. परंतु, चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील पुढील सामना ठरल्याप्रमाणे (५ मे) होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दिल्लीच्या ग्राऊंड स्टाफपैकी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचेही समजते.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -