Tuesday, June 15, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : CSK चे दोन प्रशिक्षक एअर अ‍ॅम्ब्युलन्सने चेन्नईत; दोघांनाही कोरोनाची बाधा 

IPL 2021 : CSK चे दोन प्रशिक्षक एअर अ‍ॅम्ब्युलन्सने चेन्नईत; दोघांनाही कोरोनाची बाधा 

चेन्नई सुपर किंग्स संघाच्या काही सदस्यांचा कोरोना रिपोर्ट सोमवारी पॉझिटिव्ह आला होता.

Related Story

- Advertisement -

कोरोनाने बायो-बबलमध्ये शिरकाव केल्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करावा लागला. चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाच्या काही सदस्यांचा कोरोना रिपोर्ट सोमवारी पॉझिटिव्ह आला होता. यात गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजीचाही समावेश होता. त्यानंतर चेन्नईचा ऑस्ट्रेलियन फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसीलाही कोरोनाची बाधा झाली. यंदा आयपीएलमध्ये सहभागी झालेले ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि समालोचक गुरुवारी भारतातून मालदीवसाठी रवाना झाले. हसीला मात्र त्यांच्यासोबत जाता आले नाही. त्याला आणि बालाजीला एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीहून चेन्नईत आणण्यात आले. आता हे दोघे चेन्नईत क्वारंटाईन होणार आहेत.

वैद्यकीय उपचार देणे सोपे

आम्ही हसी आणि बालाजी या दोघांनाही एअर अ‍ॅम्ब्युलन्सने चेन्नईत आणण्याचा निर्णय घेतला. आमचा चेन्नईत बऱ्याच लोकांशी संपर्क असल्याने या दोघांना सोयी-सुविधा, तसेच वैद्यकीय उपचार देणे सोपे होईल, असे चेन्नई संघाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तसेच या दोघांना कोणतीही लक्षणे नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हसीला भारतातच थांबावे लागणार

- Advertisement -

कोरोनाची बाधा झाल्यामुळे हसी अडचणीत सापडला आहे. त्याला इतर ऑस्ट्रेलियन लोकांसोबत मालदीवला जाता आले नाही. याबाबत चेन्नई संघाचे अधिकारी म्हणाले, हसीला भारतातच थांबावे लागणार आहे. त्याचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरच त्याला भारत सोडून जाता येईल. तो पूर्णपणे बरा झाल्यावर आम्ही त्याच्यासाठी विशेष चार्टर्ड विमानाची व्यवस्था करू.

- Advertisement -