घरक्रीडाIPL 2021 : डेविड वॉर्नरची विक्रमी कामगिरी; धोनीला टाकले मागे 

IPL 2021 : डेविड वॉर्नरची विक्रमी कामगिरी; धोनीला टाकले मागे 

Subscribe

आरसीबीविरुद्ध वॉर्नरने ५४ धावांची खेळी केली. 

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. या सामन्यात हैदराबादचा ६ धावांनी पराभव झाला. हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने अप्रतिम फलंदाजी करत ३७ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५४ धावांची खेळी केली. मात्र, त्याला मनीष पांडे (३८) वगळता इतरांची साथ लाभली नाही. त्यामुळे हैदराबादने यंदाच्या मोसमातील आपला सलग दुसरा सामना गमावला. हैदराबादने हा सामना गमावला असला तरी वॉर्नरने त्याच्या अर्धशतकी खेळीदरम्यान अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. आरसीबीविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता वॉर्नरच्या नावे झाला आहे.

आरसीबीविरुद्ध सर्वाधिक धावा

वॉर्नरने आरसीबीविरुद्ध आतापर्यंत ८७७ धावा केल्या असून या संघाविरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम आता त्याच्या नावे झाला आहे. त्याने हा विक्रम रचताना चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले. धोनीने आरसीबीविरुद्ध आतापर्यंत ८३३ धावा केल्या असून धोनीचा चेन्नई संघातील सहकारी सुरेश रैना या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. रैनाने आरसीबीविरुद्ध ७५५ धावा केल्या आहेत.

- Advertisement -

आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके

वॉर्नर हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा परदेशी खेळाडू आहे. त्याने १४४ सामन्यांत ५२०० धावा केल्या आहेत. तसेच आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके (४९) वॉर्नरच्याच नावावर आहेत. त्याचप्रमाणे तो लवकरच २०० षटकारांचा टप्पाही पार करेल. त्याने आतापर्यंत १९६ षटकार मारले आहेत.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -