IPL 2021 : मी अजूनही क्वारंटाईन, माझ्याविषयी चुकीची माहिती पसरवणे थांबवा; वृद्धिमान साहा भडकला

साहाचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आल्याची चर्चा होती. याबाबत त्याने ट्विटमधून स्पष्टीकरण दिले आहे.

wriddhiman saha
सनरायजर्स हैदराबादचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा

सनरायजर्स हैदराबादचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. काही खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली होती आणि यात साहाचाही समावेश होता. परंतु, आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे साहाने शुक्रवारी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. तसेच साहाचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आल्याची चर्चा होती. मात्र, हे त्याला फारसे आवडलेले नाही. त्याने याबाबतही त्याच्या ट्विटमधून स्पष्टीकरण दिले आहे. त्याची पुन्हा दोनदा कोरोना चाचणी झाली, कारण तो रुटीन चेक-अपचा भाग होता. यापैकी एका चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह, तर दुसऱ्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता त्याने लोकांना चुकीची माहिती पसरवू नका, अशी विनंती केली आहे.

प्रकृतीत खूप सुधारणा

माझा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेला नाही. रुटीन चेक-अपचा भाग म्हणून माझी दोनदा कोरोना चाचणी झाली.यापैकी एका चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह, तर दुसऱ्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मात्र, माझ्या प्रकृतीत खूप सुधारणा आहे. त्यामुळे माझ्याविषयी चुकीची माहिती पसरवणे थांबवा अशी मी सर्वांना विनंती करतो, असे साहाने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले.

४ मे रोजी साहाला कोरोनाची बाधा

यंदा कोरोनाने आयपीएलच्या बायो-बबलमध्ये शिरकाव केल्यानंतर सर्वात आधी कोलकाता नाईट रायडर्सचे दोन खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्सच्या तीन सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर पुढच्याच दिवशी म्हणजेच ४ मे रोजी साहाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे सनरायजर्स हैदराबाद संघाच्या सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांना क्वारंटाईन व्हावे लागले होते. याच दिवशी, आयपीएलचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता.