IPL 2021 Qualifier CSK vs DC : चेन्नई विरुद्ध दिल्ली पहिला क्वालिफायर, पंतचा संघ ‘या’ कारणामुळे जाईल फायनलमध्ये

Rishabh Pant and MS Dhoni

IPL 2021 Qualifier CSK vs DC : इंडियन प्रीमियर लिग २०२१ (IPL 2021) आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) असा रंगणार आहे. आज संध्याकाळी ७.३० वाजता हा सामना होणार आहे. दोन्ही संघांमध्ये ताकदीचा सामना रंगणार असून हा सामना अनुभव विरुद्ध युवा असा असणार आहे. मात्र, या सामन्यात दिल्लीचं पारडं जड आहे, असं मत वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लाराने व्यक्त केलं आहे.

ब्रायन लाराने दिल्लीच्या गोलंदांजीची प्रशंसा केली आहे. दिल्लीच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे चेन्नईच्या फलंदाजांचा कस लागणार आहे. तसंच, धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जमध्ये खोलपर्यंत फलंदाजी करणारे खेळाडू आहेत असं म्हणत लाराने दिल्लीला देखील सावध केलं आहे.

ज्या चार संघानी सर्वोत्तम क्रिकेट खेळलं ते प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी पात्र ठरलेत. यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं लारा म्हणाला.

दिल्ली विरुद्ध चेन्नई काय आहे आकडेवारी

दिल्लीच्या संघाने यंदाच्या हंगामात गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत सलग दुसऱ्या वर्षी प्ले ऑफ फेरीत पोहोचला आहे.

गेल्या वर्षी ते उपविजेते होते. मुंबई इंडियन्सकडून अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला.

चेन्नईच्या संघाने गेल्या हंगामाच्या तुलनेत यावर्षी चांगली कामगिरी करत यंदा गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलं आहे.

चेन्नई आणि दिल्ली हे संघ यंदाच्या हंगामात दोन वेळा आमने सामने आले. या दोन्ही सामन्यात दिल्लीच्या संघाने चेन्नईवर विजय मिळवला. पहिल्या सामन्यात दिल्लीने प्रथम गोलंदाजी केली होती आणि सामन्यात सात गडी राखून विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी शेवटच्या षटकात थरारक विजय खेचून आणला.

दिल्ली आणि चेन्नई हे दोन संघ आतापर्यंत IPL च्या इतिहासात एकूण २५ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी चेन्नईने १५ तर दिल्लीने १० सामन्यात विजय मिळवला आहे.

प्ले ऑफ फेरीचा विचार केल्यास दिल्लीच्या संघाने चेन्नईविरोधात दोन सामने खेळले असून त्या दोन्ही सामन्यात ते पराभूत झाले.

युएईमधील सामन्यांची आकडेवारी मात्र दिल्लीच्या बाजूने असून दिल्ली ३-१ ने आघाडीवर आहे.