IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला मोठा झटका; ‘हा’ प्रमुख खेळाडू उर्वरित मोसमाला मुकणार

राजस्थानने ग्लेन फिलिप्सला करारबद्ध केले आहे.

ben stokes and jos buttler
बेन स्टोक्स आणि जॉस बटलर

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) यंदाचा मोसम कोरोनामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. परंतु, आता उर्वरित मोसम १९ सप्टेंबरपासून युएई येथे खेळला जाणार आहे. या स्पर्धेला जवळपास महिनाभराचा कालावधी शिल्लक असतानाच राजस्थान रॉयल्स (RR) संघाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानचा इंग्लिश यष्टीरक्षक-फलंदाज जॉस बटलर आयपीएलच्या उर्वरित मोसमाला मुकणार आहे. या स्पर्धेदरम्यान बटलरची पत्नी त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म देणार असल्याने तो उर्वरित आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे राजस्थान रॉयल्स संघाकडून सांगण्यात आले.

इंग्लंडचे तीन क्रिकेटपटू मुकणार?

जॉस बटलर आयपीएलच्या उर्वरित मोसमात खेळणार नाही. त्याची पत्नी लुईसी लवकरच त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. रॉयल्स कुटुंबातील नव्या सदस्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत, असे राजस्थानने ट्विटमध्ये म्हटले. राजस्थानसाठी हा मोठा धक्का आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरही उर्वरित आयपीएलला मुकणार आहे. तसेच अष्टपैलू बेन स्टोक्सही या स्पर्धेत खेळण्याची शक्यता कमी आहे.

ग्लेन फिलिप्स संघात

राजस्थानने न्यूझीलंडचा यष्टीरक्षक-फलंदाज ग्लेन फिलिप्सला करारबद्ध केले आहे. तो कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत बार्बाडोस रॉयल्सकडून खेळत आहे. त्याने न्यूझीलंडकडून आतापर्यंत २५ टी-२० सामन्यांत १४९.७० च्या स्ट्राईक रेटने ५०६ धावा केल्या आहेत. आयपीएलचा यंदाचा मोसम मे महिन्यात अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. त्यावेळी राजस्थानचा संघ गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर होता. त्यांना सात पैकी केवळ तीन सामने जिंकता आले.


हेही वाचा – टीम डेविड ठरणार आयपीएलमध्ये खेळणारा सिंगापूरचा पहिला खेळाडू