Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : डिव्हिलिअर्सची झंझावाती खेळी; सलामीच्या लढतीत RCB विजयी

IPL 2021 : डिव्हिलिअर्सची झंझावाती खेळी; सलामीच्या लढतीत RCB विजयी

डिव्हिलियर्सने २७ चेंडूत ४८ धावांची खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला. 

Related Story

- Advertisement -

एबी डिव्हिलियर्सने केलेल्या झंझावाती खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या १४ व्या मोसमाची विजयी सुरुवात केली. सलामीच्या लढतीत आरसीबीने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला २ विकेट राखून पराभूत केले. मुंबईचा संघ २०१२ पासून आपली सलामीची लढत जिंकू शकलेला नाही. या सामन्यात मुंबईने आरसीबीला विजयासाठी १६० धावांचे आव्हान दिले होते. याचा पाठलाग करताना वॉशिंग्टन सुंदर (१०) आणि कर्णधार विराट कोहली (३३) यांनी आरसीबीच्या डावाची चांगली सुरुवात केली. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने फटकेबाजी करत २८ चेंडूत ३९ धावांची खेळी केल्यावर त्याला मार्को जेन्सनने बाद केले. तसेच शाहबाझ अहमद (१), डॅन क्रिस्टियन (१) आणि कायेल जेमिसन (४) हे फलंदाज झटपट बाद झाले. मात्र, डिव्हिलियर्सने २७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४८ धावांची खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला.

हर्षल पटेलचा भेदक मारा

त्याआधी हर्षल पटेलच्या भेदक माऱ्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला २० षटकांत ९ बाद १५९ धावांवर रोखले होते. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कर्णधार रोहित शर्मा आणि क्रिस लिन यांनी मुंबईच्या डावाची सावध सुरुवात केली. रोहित १९ धावांवर धावचीत झाला. लिनने मात्र खेळपट्टीवर वेळ घालवल्यावर फटकेबाजी केली. त्याने ३५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४९ धावा केल्या. त्याला ३१ धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवची साथ लाभली. यानंतर मात्र ईशान किशन (२८) आणि हार्दिक पांड्या (१३) वगळता मुंबईच्या फलंदाजांना दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे मुंबईने २० षटकांत ९ बाद १५९ धावा केल्या. हर्षलने २७ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट घेतल्या.

- Advertisement -