Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा रिषभ पंत धोनीपेक्षा मोठा मॅचविनर होऊ शकतो; 'या' माजी खेळाडूचे मत

रिषभ पंत धोनीपेक्षा मोठा मॅचविनर होऊ शकतो; ‘या’ माजी खेळाडूचे मत

पंतने धोनीप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न करता कामा नये.

Related Story

- Advertisement -

भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला कारकिर्दीच्या सुरुवातीला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश येत होते. मात्र, त्याने मागील काही काळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत मॅचविनिंग खेळी केली. तसेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने भारतातील पहिले शतक झळकावले. त्यातच त्याच्या यष्टिरक्षणातही बरीच सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता पुन्हा त्याची महेंद्रसिंग धोनीसोबत तुलना होत आहे. मात्र, पंतने धोनीप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न करता कामा नये, असे भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलला वाटते. तसेच पंतमध्ये धोनीपेक्षा मोठा खेळाडू बनण्याची क्षमता असल्याचेही पार्थिव म्हणाला.

सातत्याने सामने जिंकवून देऊ शकतो

रिषभ पंतमध्ये खूप आत्मविश्वास आहे आणि टी-२० क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी याच गोष्टीची आवश्यकता असते. पंत आक्रमक शैलीत फलंदाजी करतो. त्यामुळे त्याने फलंदाजी करताना फार विचार करता कामा नये. त्याची धोनीसोबत नेहमीच तुलना होते. तो स्वतःसुद्धा धोनीकडून प्रेरणा घेत असल्याचे म्हणतो. मात्र, तो उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याने धोनीप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न करता कामा नये. त्याच्यात धोनीपेक्षा मोठा खेळाडू होण्याची क्षमता आहे. तो आपल्या संघाला सातत्याने सामने जिंकवून देऊ शकतो. आता तो आयपीएल स्पर्धेतही दिल्ली कॅपिटल्ससाठी महत्वाची भूमिका बजावेल, असेही पार्थिवने नमूद केले.

कर्णधार म्हणून यशस्वी होईल

- Advertisement -

पंत यंदा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणार आहे. त्याला याआधी आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव नाही. मात्र, असे असले तरी तो कर्णधार म्हणून यशस्वी होईल असा दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांना विश्वास आहे. पंतला आता दिल्लीचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल आणि तो या संधीचे सोने करेल अशी मला आशा आहे. त्याने मागील काही काळात दमदार कामगिरी केली आहे. आता कर्णधारपदाचा त्याला खूप फायदा होईल, असेही पॉन्टिंग म्हणाला.

- Advertisement -