घरक्रीडाIPL 2021 : म्हणून त्याला भारतीय संघात स्थान मिळत नाही; गावस्कर संजू...

IPL 2021 : म्हणून त्याला भारतीय संघात स्थान मिळत नाही; गावस्कर संजू सॅमसनवर भडकले

Subscribe

सॅमसनने यंदा सलामीच्या लढतीत ११९ धावांची खेळी केली. त्यानंतरच्या तीन सामन्यांत मिळून त्याला केवळ २६ धावा करता आल्या.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये सामना झाला. बंगळुरूने हा सामना १० विकेट राखून जिंकत आपल्या सलग चौथ्या विजयाची नोंद केली. दुसरीकडे राजस्थानला चार पैकी केवळ एक सामना जिंकता आला असून त्यांच्या फलंदाजांनी निराशा केली आहे. कर्णधार संजू सॅमसनने यंदा सलामीच्या लढतीत पंजाब किंग्सविरुद्ध ११९ धावांची खेळी केली. त्यानंतरच्या तीन सामन्यांत मिळून तो केवळ २६ धावा (४, १, २१) करू शकला आहे. सॅमसन जवळपास प्रत्येक आयपीएल मोसमाच्या सुरुवातीला चांगली कामगिरी करतो, पण त्याला त्याच्या खेळात सातत्य राखता येत नाही. याच कारणाने सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळत नसल्याची टीका भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी केली.

बाद होण्याचे नवनवे मार्ग शोधून काढतो

कर्णधाराने जबाबदारीने खेळून चांगली कामगिरी करणे गरजेचे असते. सॅमसनने पहिल्या सामन्यात अप्रतिम खेळी केली. मात्र, त्यानंतर त्याची कामगिरी खालावली. त्याच्याबाबतीत हीच एक अडचण आहे. तो एका सामन्यात धावा करतो आणि पुढील सामन्यात स्वतः वेळ देण्याऐवजी चुकीचा फटका मारून बाद होतो. एका सामन्यात धावा केल्यावर पुढील सामन्यात आपोआपच धावा होतील असे त्याला वाटते. त्याला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश येते आणि म्हणूनच त्याला भारतीय संघात स्थान मिळत नाही. तो बाद होण्याचे नवनवे मार्ग शोधून काढतो, असे गावस्कर म्हणाले.

- Advertisement -

सॅमसनमध्ये चिकाटी नाही

गावस्करांप्रमाणेच भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणनेही सॅमसनवर टीका केली. सॅमसनमध्ये खूप प्रतिभा आहे. मात्र, प्रत्येक चेंडूला मान देऊन त्यानुसार फलंदाजी करण्याची त्याच्यात चिकाटी नाही, असे इरफान त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. सॅमसन बंगळुरूविरुद्ध २१ धावा करून बाद झाला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -