घरक्रीडाIPL 2021 Suspended : कोणाचा फायदा, तोटा कोणाचा?

IPL 2021 Suspended : कोणाचा फायदा, तोटा कोणाचा?

Subscribe

भारतामध्ये कोरोनाची चिंताजनक परिस्थिती आहे. मात्र, असे असतानाही इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेचा यंदाचा मोसम भारतात बायो-बबलमध्ये यशस्वीरीत्या पार पडू शकेल, असा बीसीसीआयला विश्वास होता. त्यांचा हा विश्वास फोल ठरला आणि कोरोनाने बायो-बबलमध्ये शिरकाव केलाच. काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्यांना बायो-बबलमध्ये कोरोनाची बाधा झाल्याने बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करणे भाग पडले. परंतु, आयपीएल स्थगित होण्यापूर्वी झालेल्या २९ सामन्यांत चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. काही संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली, तर काहींना आपल्या आणि चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाही. त्यामुळे आयपीएल स्थगित झाल्याने काही संघांचा फायदा झाला आहे, तर काहींचा तोटा!

मुंबई इंडियन्स – गतविजेत्या मुंबई इंडियन्सला यंदाही जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, मोसमाच्या सुरुवातीला मुंबईला चांगली कामगिरी करता आली नाही. मुंबईचे पहिले पाचही सामने चेन्नईत झाले आणि चेन्नईच्या संथ खेळपट्ट्यांवर मुंबईच्या फलंदाजांना धावांसाठी झुंजावे लागले. त्यामुळे मुंबईला पाच पैकी केवळ दोन सामने जिंकता आले होते. त्यानंतर मात्र मुंबईचा संघ दिल्लीच्या दिशेने वळला. दिल्लीच्या खेळपट्ट्या या फलंदाजीला अनुकूल होत्या. याचा फायदा मुंबईला झाला आणि त्यांनी सलग दोन विजयांची नोंद केली होती. त्यातच त्यांनी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध तब्बल २१९ धावांचा यशस्वी पाठलाग केला. त्यामुळे रोहित शर्माच्या मुंबईला लय सापडत असतानाच मोसम स्थगित झाल्याने त्यांचा नक्कीच तोटा झाला आहे.

दिल्ली कॅपिटल्स – आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली, तेव्हा दिल्लीचा संघ ८ सामन्यांत १२ गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थानावर होता. मात्र, दिल्लीला या अचानक घेण्यात आलेल्या ‘टाइम आउट’चा फायदा होऊ शकेल. याचे कारण म्हणजे दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे यंदाच्या मोसमात खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत रिषभ पंतने नेतृत्वाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. मात्र, दिल्लीला फलंदाज म्हणून श्रेयसची उणीव भासली. श्रेयस नसल्याने दिल्लीला स्टिव्ह स्मिथला तिसऱ्या क्रमांकावर खेळवावे लागले. परंतु, स्मिथला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्यातच स्टोईनिस, हेटमायर आणि रबाडा यांच्यानंतर स्मिथ हा चौथा परदेशी खेळाडू संघात असल्याने मागील वर्षी उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या एन्रिच नॉर्खियाला संघाबाहेर बसावे लागले.

- Advertisement -

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. यंदा मात्र यात बदल होऊ शकेल असे आशादायी चित्र निर्माण झाले होते. बंगळुरूला ७ पैकी ५ सामने जिंकण्यात यश आले होते. तसेच स्वतः कोहली, देवदत्त पडिक्कल यांच्यासह ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स हे विस्फोटक फलंदाज, तसेच मोहम्मद सिराज, यंदा सर्वाधिक १७ विकेट घेणारा हर्षल पटेल आणि कायेल जेमिसन हे गोलंदाज फॉर्मात होते. तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार? हा प्रश्न वगळता बंगळुरूच्या संघाला कोणत्याही गोष्टीची फार चिंता नव्हती. त्यामुळे आयपीएल अचानक स्थगित झाल्याने बंगळुरूचा नक्कीच तोटा झाला आहे.

चेन्नई सुपर किंग्स – आयपीएलचा मोसम स्थगित झाल्याने चेन्नईचा तोटा झाल्याचे म्हणायला हरकत नाही. चेन्नईला मागील वर्षी पहिल्यांदाच प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले होते. यंदा मात्र चेन्नईचा संघ पुन्हा एकदा दमदार कामगिरी करताना दिसला. चेन्नईला ७ पैकी ५ सामने जिंकण्यात यश आले होते आणि हा संघ गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे स्पर्धा स्थगित झाल्याने त्यांचे नक्कीच नुकसान झाले आहे. धोनी आणि रैनाने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. फॅफ डू प्लेसिस, ब्रावो आणि इम्रान ताहीर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झाले नसले, तरी त्यांना राष्ट्रीय संघातून खेळण्याची फारशी संधी मिळत नाही. त्यामुळे या खेळाडूंना पुन्हा लय सापडायला वेळ लागू शकेल.

- Advertisement -

राजस्थान रॉयल्स – यंदा दुखापती आणि बायो-बबलचा सर्वाधिक फटका कोणत्या संघाला बसला असेल, तर तो होता राजस्थानला. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे एकही सामना खेळू शकला नाही, तर अष्टपैलू बेन स्टोक्सला पहिल्याच सामन्यात दुखापत झाली. इंग्लिश फलंदाज लियाम लिविंगस्टन आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाज अँड्र्यू टाय वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतले. त्यामुळे राजस्थानकडे बराच काळ जॉस बटलर, डेविड मिलर, क्रिस मॉरिस आणि मुस्ताफिझूर रहमान हे चारच परदेशी खेळाडू उपलब्ध होते. त्यातच त्यांना ७ पैकी ३ सामनेच जिंकता आले. त्यामुळे आयपीएलचा मोसम स्थगित झाल्यामुळे संजू सॅमसनच्या राजस्थान संघाचा फायदा झाल्याचे म्हणता येईल.

पंजाब किंग्स – आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी पंजाबचा सामना दिल्लीविरुद्ध झाला होता. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल या सामन्याला मुकला. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने तो आणखी काही सामन्यांना मुकण्याचीही शक्यता होती. राहुल हा पंजाब कर्णधार आणि प्रमुख फलंदाज आहे. मागील वर्षी त्याने ऑरेंज कॅप पटकावली होती आणि यंदा तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर (७ सामन्यांत ३३१ धावा) होता. त्यामुळे पंजाब आणि राहुलचा आयपीएल स्पर्धा अचानक स्थगित झाल्याने नक्कीच फायदा झाला आहे. परंतु, काही महिन्यांत या स्पर्धेला पुन्हा सुरुवात झाल्यास क्रिस गेल आणि तब्बल चार सामन्यांत शून्यावर बाद होणारा निकोलस पूरन यांसारखे खेळाडू त्यांच्या कामगिरीत सुधारणा करतील अशी चाहत्यांना नक्कीच आशा असेल.

कोलकाता नाईट रायडर्स – आयपीएलचे मागील दोन मोसम कोलकातासाठी विसरण्याजोगे ठरले आहेत. मागील वर्षी सुरुवातीला दिनेश कार्तिकने या संघाचे कर्णधारपद भूषवले. मग स्पर्धेदरम्यान त्याच्या जागी इंग्लंडचा वर्ल्डकप विजेता कर्णधार इयॉन मॉर्गनची कोलकाताच्या कर्णधारपदी निवड झाली. परंतु, या नेतृत्व बदलानंतरही कोलकाता संघाच्या कामगिरीत फारशी सुधारणा झाली नाही. यंदा त्यांना ७ पैकी केवळ २ सामने जिंकता आले. त्यातच मॉर्गनने कर्णधार म्हणूनही बऱ्याच चुका केल्या. आंद्रे रसेल, सुनील नरीन आणि शाकिब यांसारख्या अनुभवी परदेशी खेळाडूंना आपली छाप पाडता आली नाही. त्यामुळे त्यांना अचानक मिळालेली ही विश्रांती फायदेशीर ठरू शकेल.

सनरायजर्स हैदराबाद – आयपीएलचा मोसम स्थगित होण्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला असेल, तर तो आहे हैदराबाद संघाला! हैदराबादला यंदा ७ पैकी केवळ एक सामना जिंकण्यात यश आले. त्यातच त्यांनी डेविड वॉर्नरची हकालपट्टी करत केन विल्यमसनची कर्णधारपदी निवड केली. हैदराबादला जवळपास प्रत्येकच मोसमात मधल्या फळीत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या फलंदाजांची उणीव भासते. यंदाही यात बदल झाला नाही. फलंदाजीत बेअरस्टो आणि विल्यमसन, तर गोलंदाजीत राशिद खान वगळता इतरांना लय सापडली नाही. त्यामुळे आयपीएल मोसमाला तूर्तास ब्रेक लागल्याचा हैदराबादला नक्कीच आनंद असेल.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -