Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : MI vs RCB सलामीच्या सामन्यात 'या' खेळाडूंवर नजर 

IPL 2021 : MI vs RCB सलामीच्या सामन्यात ‘या’ खेळाडूंवर नजर 

या दोन्ही संघांमध्ये बरेच स्टार खेळाडू आहेत.

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. मुंबई आणि आरसीबी हे आयपीएल स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय संघ मानले जातात. त्यातच मुंबई आणि आरसीबी या संघांचे नेतृत्व अनुक्रमे रोहित शर्मा आणि विराट कोहली करतात. त्यामुळे या सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. तसेच या दोन्ही संघांमध्ये बरेच स्टार खेळाडू असल्याने या सामन्यावर आणि काही खेळाडूंच्या कामगिरीवर चाहत्यांची विशेष नजर असेल.

विराट कोहली – आरसीबीचा कर्णधार विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्याने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत चांगली कामगिरी केली. त्याने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २३१ धावा, तर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १२९ धावा केल्या. कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक ५८७८ धावा फटकावल्या असून तो सलामीच्या सामन्यातही दमदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल.

- Advertisement -

एबी डिव्हिलियर्स – दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स हा ‘फॅन फेव्हरेट’ आहे असे म्हणायला हरकत नाही. एबीमध्ये मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात फटके मारण्याची क्षमता असून तो अनेक वर्षे आरसीबीसाठी मॅचविनर ठरला आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १६९ सामन्यांत तीन शतकांच्या मदतीने ४८४९ धावा केल्या आहेत. त्यामुळे यंदा त्याला आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पार करण्याची संधी आहे.

ग्लेन मॅक्सवेल – ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला मागील मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. असे असतानाही यंदाच्या खेळाडू लिलावात आरसीबीने त्याला १४.२५ कोटी रुपयांत खरेदी केले. आरसीबीला मॅक्सवेलकडून मोठ्या अपेक्षा असून तो कोहली आणि एबी यांच्यावरील ताण कमी करेल अशी त्यांना आशा आहे. त्यामुळे तो सलामीच्या लढतीत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

- Advertisement -

रोहित शर्मा – रोहित हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. मागील वर्षीच्या अंतिम सामन्यात रोहितने अर्धशतकी खेळी मुंबईच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत २०० सामन्यांत ५२३० धावा केल्या असून यात एका शतकाचा समावेश आहे. आता आरसीबीविरुद्ध सलामीच्या लढतीत दमदार कामगिरीचे त्याचे लक्ष्य असेल.

जसप्रीत बुमराह – मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने मागील आयपीएल मोसमात उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने मागील मोसमात २७ विकेट काढल्या होत्या. आपल्या यॉर्करसाठी ओळखल्या जाणाऱ्या बुमराहने आयपीएलमध्ये आतापर्यंत ९२ सामन्यांत १०९ विकेट घेतल्या आहेत. तो नुकताच विवाहबंधनात अडकल्याने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत खेळू शकला नव्हता. त्यामुळे आयपीएलमध्ये चांगल्या कामगिरीसाठी आता तो सज्ज आहे.

 

- Advertisement -