घरक्रीडाIPL 2021 : बायो-बबल म्हणजे नक्की काय अन् त्यात कोरोनाचा शिरकाव झाला...

IPL 2021 : बायो-बबल म्हणजे नक्की काय अन् त्यात कोरोनाचा शिरकाव झाला कसा?

Subscribe

आयपीएल स्पर्धा बायो-बबलमध्ये सुरक्षितरित्या पार पडू शकेल असा बीसीसीआयला विश्वास होता. मात्र, त्यांचा हा विश्वास फोल ठरला.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, असे असतानाही आयपीएल स्पर्धा बायो-बबलमध्ये सुरक्षितरित्या पार पडू शकेल असा बीसीसीआयला विश्वास होता. मात्र, त्यांचा हा विश्वास फोल ठरला. आयपीएल बायो-बबलमध्ये कोरोनाने शिरकाव केला. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सच्या दोन खेळाडूंना आणि चेन्नई सुपर किंग्सच्या काही सदस्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यापाठोपाठ मंगळवारी आणखी दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करणे भाग पडले. मात्र, बीसीसीआयने इतकी तयारी केल्यानंतरही आणि बायो-बबलमध्ये असतानाही खेळाडूंना कोरोनाची बाधा झालीच कशी?

बायो-बबल म्हणजे काय?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, जगभरातील बहुतांश खेळांच्या स्पर्धा या बायो-बबलमध्ये घ्याव्या लागत आहेत. आयपीएल स्पर्धाही बायो-बबलमध्ये झाली. खेळाडू आणि या स्पर्धेशी निगडित लोक सुरक्षित राहावेत यासाठी स्पर्धा बायो-बबल वातावरणात घेतली जाते. इथे बाहेरील व्यक्तींना प्रवेश दिला जात नाही आणि खेळाडूंनाही बाहेर जाण्याची परवानगी नसते. प्रत्येक संघ आपल्या खेळाडूंसाठी एका हॉटेलची व्यवस्था करतात. या हॉटेलमध्ये केवळ याच संघाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे सदस्य राहतात.

- Advertisement -

खेळाडू हॉटेलमधून बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यांना हॉटेलमधून मैदानात बसने नेले जाते. तिथे खेळाडू सामना खेळतात किंवा सराव करतात. त्यानंतर खेळाडूंना पुन्हा त्याच बसने मैदानातून हॉटेलमध्ये परत आणले जाते. त्यामुळे त्यांचा बाहेरील व्यक्तींशी संपर्क येत नाही. खेळाडूंची सातत्याने कोरोना चाचणी केली जाते. तसेच खेळाडूंना जीपीएस दिले जाते, जेणेकरून ते कुठे आहेत, हे कळत राहावे.

बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला कसा?  

खेळाडूंना काही विशिष्ट कारणांसाठी बायो-बबलच्या बाहेर जाता येते. खेळाडूंना दुखापत झाली, तर त्याचा स्कॅन काढण्यासाठी खेळाडूंना हॉटेलमधून एका गाडीने हॉस्पिटलमध्ये नेले जाते. याला ‘ग्रीन चॅनल’ प्रोटोकॉल म्हणतात. कोलकाताचा फिरकीपटू वरूण चक्रवर्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याआधी काही दिवस त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. खांद्याचा स्कॅन काढण्यासाठी तो आयपीएलच्या ‘ग्रीन चॅनल’ प्रोटोकॉलच्या आधारे बायो-बबलच्या बाहेर गेला होता. त्यामुळे त्याचा बाहेरील व्यक्तींशी संपर्क आला आणि तिथेच त्याला कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

- Advertisement -

वरूण स्कॅन काढून आल्यानंतर कोलकाता संघातील सहकारी संदीप वॉरियरसोबत जेवला होता. त्यानंतर वॉरियरची तब्येत बिघडली. इथूनच कोरोनाने बायो-बबलमध्ये शिरकाव केल्याची शक्यता आहे. तसेच बीसीसीआयने यंदा आयपीएलच्या आयोजनात काही चुका केल्या. त्यांनी ग्राऊंड स्टाफला बायो-बबलमध्ये ठेवले नाही. त्यामुळे त्यांचा बाहेरील व्यक्तींशी संपर्क येत होता. तसेच खेळाडूंना देण्यात आलेल्या जीपीएस उपकरणांत काही तांत्रिक बिघाड होता. या सर्व गोष्टींमुळे बायो-बबलमध्ये असलेले खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य पूर्णपणे सुरक्षित राहू शकले नाहीत.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -