IPL 2022 Schedule: आयपीएल २०२२चं शेड्यूल जारी, २६ मार्चला ‘हे’ दोन संघ भिडणार आमनेसामने, जाणून घ्या वेळापत्रक

आयपीएल २०२२चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलमधील पहिल्या सामन्याला २६ मार्चपासून सुरूवात होणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये होणार आहे. तसेच आयपीएलचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी ७.३० वाजता सुरूवात होणार आहे. लीग राऊंडमधील सर्व ७० सामने मुंबई आणि पुण्याच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. १० संघ प्रत्येकी १४ सामने खेळणार आहेत. आयपीएल २०२२ चा शेवटचा सामना संध्याकाळी ७.३० वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यामध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत.

जाणून घ्या आयपीएलचं वेळापत्रक


दरम्यान, आयपीएल २०२२ च्या स्पर्धेला २६ मार्चपासून सुरू होणार आहे, तर शेवटचा सामना २९ मे रोजी होणार आहे. यावेळी होणार्‍या लीगचे सर्व ७० सामने मुंबई आणि पुण्यात खेळवले जाणार आहेत. एकूण ५५ सामने मुंबईत, तर १५ सामने पुण्यात होणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २० सामने, सीसीआयचे १५, डीवाय पाटील स्टेडियममध्ये २० सामने होणार आहे. तर पुण्यात एमसीए स्टेडियमवर १५ सामने खेळवले जाणार आहेत.

दरम्यान, पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने गेल्या वर्षी २०२१ चे विजेतेपद पटकावले होते. मात्र, यावेळी कोणता संघ विजेतेपद पटकावणार हे पाहणं चाहत्यांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

२०११ प्रमाणेच या वेळीही सामने गटांमध्ये विभागले जाणार आहेत. १० संघ दोन गटांत विभागले जाणार आहेत. दोन्ही गटात प्रत्येकी पाच संघ असतील. नुकत्याच झालेल्या लिलावात एकूण २०४ खेळाडूंना खरेदी करण्यात आलं आहे. तसेच यंदांचा सर्वात महागडा विकला जाणारा खेळाडू मुंबई इंडियन्समधून इशान किशन ठरला आहे.


हेही वाचा : मंत्रिमंडळाच्या बैठकीत गैरहजर राहण्यात गडाख, शिंगणे, सामंत आघाडीवर