घरक्रीडाIPL : पुढील आयपीएल मोसमापूर्वी ‘मेगा लिलाव’; संघांना केवळ चार खेळाडू करता...

IPL : पुढील आयपीएल मोसमापूर्वी ‘मेगा लिलाव’; संघांना केवळ चार खेळाडू करता येणार रिटेन

Subscribe

प्रत्येक संघ तीन भारतीय आणि एक परदेशी खेळाडू किंवा दोन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडूंना रिटेन करू शकणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम मे महिन्यात अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. मात्र, आता उर्वरित मोसम सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईत खेळवला जाणार आहे. परंतु, यंदाचा मोसम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएलच्या पुढील मोसमासाठी योजना आखण्यास सुरुवात केली आहे. आयपीएलच्या पुढील मोसमात दोन नव्या संघांचा समावेश करून घेण्याचा बीसीसीआय विचार करत आहे. या दोन संघांच्या खरेदीच्या प्रक्रियेला ऑगस्टच्या मध्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. या दोन नव्या संघांची ऑक्टोबरच्या मध्यात घोषणा केली जाऊ शकेल. तसेच बीसीसीआय एकूण १० संघांसाठी डिसेंबरमध्ये मेगा लिलाव घेण्याच्या विचारात आहे.

चार खेळाडू करता येणार रिटेन

मेगा लिलाव होण्यापूर्वी प्रत्येक संघाला चार खेळाडू रिटेन (संघात कायम ठेवणे) करण्याची संधी असणार आहे. प्रत्येक संघ तीन भारतीय आणि एक परदेशी खेळाडू किंवा दोन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडूंना रिटेन करू शकणार आहे. मात्र, त्यासाठी संघांना मोठी किंमत द्यावी लागणार आहे. तीन खेळाडूंना रिटेन करताना संघांना प्रत्येकी १५ कोटी, ११ कोटी आणि ७ कोटी रुपये या खेळाडूंना द्यावे लागणार आहेत. तसेच दोन खेळाडू रिटेन केल्यास १२.५ आणि ८.५ कोटी, तर केवळ एक खेळाडू रिटेन केल्यास त्या खेळाडूला १२.५ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

- Advertisement -

खेळाडू खरेदी करण्यासाठी ९० कोटी

आतापर्यंत लिलावात प्रत्येक संघाला खेळाडू खरेदी करण्यासाठी एकूण ८५ कोटी रुपये खर्च करता येत होते. आता यात पाच कोटी रुपयांची वाढ होणार असून प्रत्येक संघाकडे खेळाडू खरेदी करण्यासाठी ९० कोटी रुपये असणार आहेत. तसेच प्रत्येक संघाला ९० कोटी रुपयांतील ७५ टक्के रक्कम खर्च करणे अनिवार्य असणार आहे. परंतु, बीसीसीआय या सर्व गोष्टींबाबत विचार करत असून अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -