IPL 2022: शिखर धवन लवकरच बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण?, चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात

इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (आयपीएल) पंजाब किंग्जकडून खेळणार शिखर धवन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. एका चित्रपटाच्या माध्यमातून शिखर धवन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

shikhar dhawan
श्रीलंका दौऱ्यात शिखर धवन करणार टीम इंडियाचे नेतृत्व?  

इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (आयपीएल) पंजाब किंग्जकडून खेळणार शिखर धवन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येत आहे. एका चित्रपटाच्या माध्यमातून शिखर धवन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र, या चित्रपटाबद्दलची सर्व माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. दरम्यान, या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिखरच्या मनात कलाकारांबद्दल नेहमीच आदराची भावना आहे. त्याला जेव्हा रोल ऑफर केला गेला, तेव्हा त्याने तो आनंदाने स्वीकारला. चित्रपटाच्या निर्मात्यांना शिखर त्या भूमिकेसाठी योग्य वाटला. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिखरशी याबाबत संपर्कही साधला. शिखरला चांगला रोल मिळाला आहे. त्याची महत्त्वाची भूमिका या चित्रपटात आहे. या वर्षी हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिखर धवन याने जानेवारी महिन्यात इन्स्टाग्रामवर एक रिल पोस्ट केली होती. त्यात तो पुष्पा चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसत होता. अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील डायलॉग शिखर खूप सहज आणि सुंदर पद्धतीने बोलला होता. पुष्पा चित्रपटाने जवळपास 300 कोटींची कमाई केली आहे.

डिसेंबर 2021 मध्ये शिखरने अभिनेता रणवीर सिंह सोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यात शिखरने ’83’ चित्रपटात कपिल देवची भूमिका साकारणाऱ्या रणवीरला शुभेच्छा दिल्या होत्या. भारताने पहिला क्रिकेट वर्ल्ड कप 1983 मध्ये जिंकला. त्यावर हा चित्रपट आधारीत होता.

यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या पर्वात शिखर उत्तम कामगिरी करत आहे. यंदाच्या आयपीएलच्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो चौथ्या स्थानावर आहे. आतापर्यंत त्याने 421 धावा फटकावल्या आहेत. 88 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या असून तीन अर्धशतक आहेत. पंजाब किंग्सचा लीगमधील शेवटचा सामना रविवारी 22 मे रोजी खेळणार आहे.


हेही वाचा – IPL 2022: एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेलची ‘आरसीबी’च्या Hall of Fame मध्ये निवड