मुंबई : गेले काही महिने हे भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांसाठी निराशाजनक राहिले आहेत. पण आता लवकरच भारतातील सुप्रसिद्ध क्रिकेट लीगला सुरुवात होणार असून क्रिकेटप्रेमींना या लीगचे वेध लागले आहेत. रविवारी (12 जानेवारी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) सर्वसाधारण बैठक (MGM) पार पडली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग 2025ची (IPL 2025) तारीखदेखील यावेळी समोर आली आहे. (IPL 2025 will start from 23 March says BCCI vice president rajeev shukla)
हेही वाचा : BCCI Secretary : यांनी घेतली जय शहांची जागा; प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळले फक्त 4 सामने अन्…
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी बैठक झाल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना तारीख जाहीर केली. त्यांनी सांगितले की, 23 मार्चपासून आयपीएल 2025 ची सुरुवात होणार आहे. गेल्यावर्षी म्हणजे 2024 मध्येही 22 मार्चपासूनच आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे आता भारतीय क्रिकेटप्रेमींची उत्सुकता आणखी वाढली आहे. दरम्यान, या बैठकीत आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी महिला प्रीमियर लीगबद्दलही राजीव शुक्ला यांनी माहिती दिली. WPL 2025च्या सामन्यांबाबत सर्वाकाही ठरवण्यात आले असून याबद्दलही लवकरच घोषणा केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता यंदाच्या घडीला WPL 2025 काय विशेष असणार? तसेच IPL 2025 चे वेळापत्रक कसे असणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ निवडण्यासाठी 18 किंवा 19 जानेवारीला निवड समितीची बैठक होणार आहे. राजीव शुक्ला यांनी सांगितले की चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा 19 जानेवारीला केली जाणार आहे. तसेच, जय शहा हे आयसीसीचे अध्यक्ष झाल्यापासून बीसीसीआयचे सचिवपद हे रिक्त होते. यावेळी अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहणाऱ्या माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया यांची बीसीसीआयच्या सचिवपदी निवड या बैठकीत करण्यात आली. तसेच, बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदी प्रभजीत सिंग भाटीया यांची निवड करण्यात आली. त्यासाठी मुंबईमध्ये बीसीसीआयची बैठक झाली असून पुढील बैठक ही 18 आणि 19 जानेवारीला होणार आहे.