नवी दिल्ली : भारतीय संघाने टी 20 विश्वचषक जिंकल्यानंतर सर्व क्रिकेट चाहत्यांना वेध लागले आहेत ते आयपीएल 2025चे. कारण, पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना एका स्पर्धेत पाहण्यासाठी सर्वच क्रीडाप्रेमी उत्सुक असून आयपीएल अशांसाठी एक मोठी पर्वणी असते. यंदा, इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2025 च्या 18 व्या हंगामाचा बिगुल वाजला आहे. यासाठी मेगा लिलाव हा 24 नोव्हेंबर आणि 25 नोव्हेंबरला सौदी अरेबियामधील जेद्दाह येथे होणार आहे. त्यामुळे आता हा मेगा लिलाव किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार? या संदर्भात माहिती समोर आली आहे. (IPL Auction 2025 mega auction timing and watch on this platforms)
हेही वाचा : IND vs AUS Test : पहिला दिवस गोलंदाजांचा, पडल्या 17 विकेट्स
IPL 2025 च्या मेगा लिलावासाठी एकूण 574 खेळाडूंची निवड करण्यात आली. त्यात 366 भारतीय आणि 208 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएल 2025 च्या लिलावासाठी 13 देशांतील एकूण 574 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये स्कॉटलंडचा एक आणि झिम्बाब्वेच्या 3 खेळाडूंचा समावेश आहे. या मेगा लिलावात 81 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये, तर 27 खेळाडूंची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये आहे. त्याच वेळी, या यादीत 18 खेळाडू आहेत, ज्यांची मूळ किंमत 1.25 कोटी रुपये आहे.
आयपीएल 2025 चा मेगा लिलाव सौदी अरेबियाच्या वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता सुरू होणार आहे. म्हणजेच भारतीय वेळेनुसार, दुपारी 3 वाजल्यापासून मेगा लिलाव सुरू होणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर हा लिलाव पाहू शकता तर, मोबाइलवर Jio Cinema च्या ॲपवरही हा लिलाव पाहू शकतात. दरम्यान, या मेगा लिलावात केएल राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल असे भारतीय खेळाडू उतरणार आहेत. तर, परदेशी खेळाडूंमध्ये ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस, जोस बटलर, डेव्हिड वॉर्नर, टिम डेव्हिड, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी आणि मिचेल स्टार्क यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश असणार आहे.