घरक्रीडाIND vs ENG : आयपीएलमुळे भारताच्या युवा खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो!

IND vs ENG : आयपीएलमुळे भारताच्या युवा खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो!

Subscribe

लक्ष्मणने सूर्यकुमार आणि किशनची स्तुती केली.

भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत इंग्लंडवर मात केली. या मालिकेत विराट कोहलीचा भारतीय संघ पिछाडीवर पडला होता. इंग्लंडकडे तीन सामन्यांनंतर २-१ अशी आघाडी होती. परंतु, भारताने अखेरचे दोन्ही सामने जिंकत पाच सामन्यांची ही मालिका ३-२ अशी खिशात घातली. भारताच्या या यशात युवा खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली. या मालिकेत सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. या संधीचे सोने करताना या दोघांनी एक-एक अर्धशतक झळकावले. हे दोघे आणि भारताच्या इतर युवा खेळाडूंच्या यशाचे श्रेय आयपीएल स्पर्धेला जाते, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस लक्ष्मणने व्यक्त केले.

ज्याप्रकारे पुनरागमन केले ते कौतुकास्पद

टी-२० मालिकेत भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले आणि अखेरच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारत इंग्लंडला अडचणीत टाकले. पिछाडीवर पडल्यानंतर ही मालिका ३-२ अशी जिंकल्याचा भारतीय संघाला अभिमान वाटला पाहिजे. मात्र, त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे त्यांनी जगातील अव्वल टी-२० संघाविरुद्ध ज्याप्रकारे पुनरागमन केले ते फारच कौतुकास्पद होते, असे लक्ष्मण म्हणाला.

- Advertisement -

…त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे सोपे

लक्ष्मणने भारताच्या युवा खेळाडूंचीही स्तुती केली. सूर्यकुमार आणि ईशान यांनी इंग्लंडविरुद्ध अप्रतिम कामगिरी केली. त्यांच्या या यशाचे श्रेय आयपीएल स्पर्धेला जाते. आयपीएलमध्ये भारताच्या युवा खेळाडूंना जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत आणि खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळते. या खेळाडूंकडून त्यांना बऱ्याच गोष्टी शिकता येतात. आयपीएल स्पर्धेत खेळल्यामुळे भारताच्या युवा खेळाडूंच्या केवळ खेळात सुधारणा होत नाही, तर त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे थोडे सोपे होते, असेही लक्ष्मणने सांगितले.

 

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -