IPL Team Preview : दिल्ली कॅपिटल्स

यंदा आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.

Delhi Capitals
दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स संघाला एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही. यंदा मात्र यात बदल होईल अशी दिल्लीच्या संघाला आशा आहे. युवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात या संघाने मागील मोसमात चांगली कामगिरी केली होती. त्यांना तब्बल सात वर्षांनंतर प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यात यश आले होते. यंदा आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करण्याचे दिल्लीच्या संघाचे लक्ष्य असेल.

आयपीएल स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे जास्तीतजास्त चांगले भारतीय खेळाडू असले पाहिजेत, असे म्हटले जाते. दिल्लीच्या संघात कर्णधार अय्यरसह रिषभ पंत, शिखर धवन, अक्षर पटेल, अमित मिश्रा, पृथ्वी शॉ, इशांत शर्मा यांसारख्या उत्कृष्ट भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. त्यातच त्यांनी आता भारताचा प्रमुख ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनाही आपल्या संघात समाविष्ट करुन घेतले आहे. त्यामुळे आता हा संघ अधिकच मजबूत झाला असून यंदा दिल्ली पहिल्यांदा विजेता ठरण्याची शक्यता बळावली आहे.

युएईमधील खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल असू शकतील आणि याचा फायदा दिल्लीला होऊ शकेल. या संघात अश्विन, अक्षर पटेल, अमित मिश्रा, संदीप लामिचाने यांसारखे अप्रतिम फिरकीपटू आहेत. दिल्लीचा संघ संतुलित वाटत आहे. या संघाची एक कमकुवत बाजू म्हणजे त्यांचे परदेशी खेळाडू. कगिसो रबाडा वगळता या संघात मॅचविनर म्हणता येतील असे परदेशी खेळाडू नाहीत. त्यामुळे हा संघ भारतीय खेळाडूंवर जास्त अवलंबून असणार आहे. मात्र, त्यांचे बहुतांश भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले असल्याने, दबाव कसा हाताळायचा हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे या संघात जेतेपद पटकावण्याची क्षमता आहे असे नक्की म्हणता येईल.


संघ – भारतीय खेळाडू : रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, अक्षर पटेल, अमित मिश्रा, पृथ्वी शॉ, ईशांत शर्मा, आवेश खान, मोहित शर्मा, हर्षल पटेल, तुषार देशपांडे, ललित यादव

परदेशी खेळाडू : शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोईनिस, कगिसो रबाडा, अ‍ॅलेक्स कॅरी, किमो पॉल, संदीप लामिचाने, एन्रिच नॉर्खिया, डॅनियल सॅम्स   

जेतेपद – एकदाही नाही

सलामीचा सामना – वि. पंजाब (२० सप्टेंबर)