IPL 2020 : किशनने सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी न करण्यामागे ‘हे’ कारण!

सुपर ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या आणि पोलार्ड फलंदाजीला आले.  

Ishan Kishan
ईशान किशन 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या आयपीएल लढतीत मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. नियमित सामन्यात दोन्ही संघांनी २०१-२०१ धावा केल्या. मुंबईचा पराभव होणार असे वाटत असतानाच युवा डावखुरा फलंदाज ईशान किशनने ५८ चेंडूत ९९ धावांची खेळी करत मुंबईच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, मुंबईला जिंकण्यासाठी दोन चेंडूत ५ धावांची आवश्यकता असताना षटकार मारण्याच्या नादात किशन बाद झाला. अखेरच्या चेंडूवर किरॉन पोलार्डने चौकार लगावल्याने सामना बरोबरीत राहिला आणि त्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यात किशन फलंदाजीला आला नाही आणि बंगळुरूने हा सामना जिंकला. त्यामुळे मुंबईच्या निर्णयावर बरीच टीका झाली. परंतु, सामन्यानंतर किशन फलंदाजीला न येण्यामागचे कारण कर्णधार रोहित शर्माने सांगितले.

ईशान मोठे फटके मारू शकतो

हा सामना खूपच उत्कृष्ट झाला. आम्ही फलंदाजीच्या सुरुवातीला निराशाजनक खेळ केला. मात्र, ईशानने अप्रतिम खेळी करत आमच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. आम्ही सुरुवात चांगली केली नाही, पण आमच्याकडे खूप चांगले फलंदाज आहेत आणि आम्ही २०० धावा करू शकतो हा मला विश्वास होता. पोलार्ड खेळपट्टीवर टिकला होता आणि त्याच्यात फटकेबाजी करण्याची क्षमता असल्याचे आपल्याला माहितीच आहे. ईशानसुद्धा मोठे फटके मारू शकतो. त्यामुळे आम्ही सामना जिंकू शकतो हे आम्हाला माहित होते. सुपर ओव्हरमध्ये ईशान फलंदाजीला आला नाही, कारण त्याच्यात ऊर्जाच नव्हती. तो दमला होता आणि म्हणूनच आम्ही हार्दिक पांड्याला फलंदाजीला पाठवले, असे सामन्यानंतर रोहित म्हणाला.