न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना सुरु होण्याआधीच भारताच्या चिंतेत भर पडली आहे. त्यांचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा उजवा पाय दुखावल्याने शुक्रवारी सराव सत्रात सहभागी झाला नाही. ईशांत मैदानात आला होता, पण सराव होण्याआधीच त्याचा पाय दुखावला. या दुखापतीमुळे शनिवारपासून सुरु होणार्या दुसर्या कसोटी सामन्याला ईशांतला मुकावे लागू शकेल.
मागील महिन्यात विदर्भाविरुद्धच्या रणजी सामन्यात ईशांतच्या पायाला दुखापत झाली. मात्र, तो न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी फिट झाला. वेलिंग्टनमध्ये झालेल्या या सामन्यात भारताच्या इतर गोलंदाजांना फारसे यश मिळत नसताना ईशांतने पहिल्या डावात ६८ धावांत ५ गडी बाद केले होते. त्यामुळे त्याला दुसर्या कसोटीला मुकावे लागल्यास भारताला मोठा धक्का बसेल. त्याच्या जागी उमेश यादव किंवा नवदीप सैनीला संधी मिळेल.