ISSF World Championships : ५० मीटर पिस्तुल स्पर्धेत भारताला सुवर्ण

भारताचा नेमबाजपटू ओम प्रकाश मिठारवाल याने आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ५० मीटर पिस्तुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

om prakash won gold in ISSF world championship
ओम प्रकाशने मिळवले सुवर्णपदक

साउथ कोरियात सुरू असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ५० मीटर पिस्तुल स्पर्धेत भारताच्या २३ वर्षीय ओम प्रकाश मिठारवालने ५६४ गुणांसह भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. याआधी ओमने गोल्ड कोस्ट येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते.

ओमने सर्बियाच्या दामीर याला मागे टाकत सुवर्णपदक मिळवले असून दामीरच्या खात्यावर ५६२ गुण होते. त्यामुळे २ गुणांच्या अधिक फरकाने ओमने सुवर्ण मिळवले आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ५६० गुणांसह साउथ कोरियाचा देयमिंग ली विराजमान आहे.

क्रिडामंत्री राज्यवर्धन यांनीही केले अभिनंदन

ओम प्रकाश मिठारवालने आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये केलेल्या अप्रतिम कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. भारताचे क्रिडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून एक पोस्ट करत ओमचे अभिनंदन केले आहे.