ISSF World Cup : भारताचे नेमबाज मनू भाकर, सौरभ चौधरीला मिश्र दुहेरीत रौप्यपदक

यशस्विनी सिंह देस्वाल आणि अभिषेक वर्मा या भारताच्या अन्य जोडीला पदकाने हुलकावणी दिली.

manu bhaker and saurabh chaudhary
भारताचे नेमबाज मनू भाकर आणि सौरभ चौधरी

भारताचे युवा नेमबाज मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी आपली दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. मनू आणि सौरभ या जोडीला क्रोएशिया येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्डकपमध्ये (ISSF World Cup) १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या मिश्र दुहेरीत रौप्यपदक जिंकण्यात यश आले. भारताच्या या जोडीचे रौप्यपदक निश्चित झाले होते. त्यांच्यात विटालिना बात्सराशकिना आणि आर्टेम चेर्नोयुसोव्ह या रशियाच्या जोडीमध्ये १२-१२ अशी बरोबरी होती. मात्र, अखेरच्या दोन फेऱ्यांमध्ये पराभूत झाल्याने मनू आणि सौरभ या जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

देस्वाल-वर्मा जोडीला पदकाची हुलकावणी

मनू आणि सौरभला रौप्यपदक जिंकण्यात यश आले. परंतु, १० मीटर एअर पिस्तूलमध्येच यशस्विनी सिंह देस्वाल आणि अभिषेक वर्मा या भारताच्या अन्य जोडीला पदकाने हुलकावणी दिली. कांस्यपदकासाठीच्या प्ले-ऑफमध्ये देस्वाल आणि वर्मा या जोडीला गोलनोश सेबघातोल्लाही आणि जावेद फोरूघी या इराणच्या जोडीने ७-१७ असे पराभूत केले.

रायफल नेमबाजांकडून निराशा 

तसेच भारताच्या रायफल नेमबाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. १० मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत एलावेनिल वलारिवान आणि दिव्यांश सिंह पन्वर यांनी ४१६.१ गुणांसह दुसरी फेरी गाठली होती. मात्र, त्यांना अंतिम फेरी गाठता आली नाही. तर अंजुम मुद्गिल आणि दीपक कुमार यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.