जैव-सुरक्षित वातावरणात क्रिकेट खेळणे अशक्यच!

राहुल द्रविडचे मत

करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांत क्रिकेटचा एकही सामना झालेला नाही. मात्र, आता काही देशांमध्ये लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणल्यामुळे क्रिकेट पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा होत आहे. खासकरुन इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) लवकरच पुन्हा क्रिकेट खेळण्यास उत्सुक असून आपल्या खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी जैव-सुरक्षित वातावरण तयार करण्याचा विचार करत आहे. ही गोष्ट इंग्लंडला करणे शक्य आहे. परंतु, भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता त्यांना जैव-सुरक्षित वातावरणात खेळणे अशक्यच आहे, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने व्यक्त केले.

ईसीबीचा प्रस्ताव हा थोडा अवास्तविक आहे. तो प्रत्यक्षात उतरवणे अवघड आहे. ते पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळण्यास उत्सुक आहेत. कारण या मालिकांपासून त्यांच्या क्रिकेट मोसमाला सुरुवात होईल. ईसीबी कदाचित जैव-सुरक्षित वातावरण तयार करण्यात यशस्वी होईलही; पण हे सर्वांना शक्य होणार नाही. भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक असते. आपला संघ विविध दौर्‍यांवर खूप प्रवास करतो आणि त्यात बर्‍याच लोकांचा सहभाग असतो. त्यामुळे आपल्याला जैव-सुरक्षित वातावरणात क्रिकेट खेळणे अशक्यच आहे, असे द्रविड म्हणाला.

ईसीबीप्रमाणेच दक्षिण आफ्रिकाही जैव-सुरक्षित वातावरणात खेळण्याचा विचार करत आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर जाणार आहे; पण करोनामुळे या मालिकेबाबत साशंकता निर्माण झाली आहे. जैव-सुरक्षित वातावरणाबाबत बोलायचे तर तिथे सर्वांची चाचणी होणार, खेळाडूंना क्वारंटाईनमध्ये ठेवणार. मात्र, एखादा खेळाडू कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी करोना पॉझिटिव्ह सापडला तर काय करणार? सध्याच्या नियमांप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग सर्वांनाच क्वारंटाईनमध्ये ठेवेल. तसे झाल्यास त्या दौर्‍यावर आणि जैव-सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी केलेला खर्च वाया जाणार नाही का? त्यामुळे आपल्याला आरोग्य विभाग आणि सरकारशी चर्चा करून योग्य मार्ग शोधून काढावा लागेल. जेणेकरुन एखादा खेळाडू करोना पॉझिटिव्ह असला तरी ती मालिका रद्द होणार नाही, असे द्रविडने नमूद केले.

जैव-सुरक्षित वातावरण म्हणजे काय?

ईसीबी आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका जैव-सुरक्षित वातावरण म्हणजेच बायो-बबल तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. यात संघ आणि खेळाडूंना सुरक्षित राहून सराव करता येईल. तसेच खेळाडूंची चाचणीही करण्यात येईल. तिथे सॅनिटाईज केलेला भाग असेल, जिथे केवळ खेळाडू, प्रशिक्षक आणि संघाच्या अधिकार्‍यांनाच येण्याची परवानगी असेल. त्याचप्रमाणे तेथून मैदानही जवळ असेल. मालिका संपत नाही, तोपर्यंत खेळाडूंना आपल्या कुटुंबापासून दूर राहावे लागेल.