घरक्रीडातो परत आलाय!

तो परत आलाय!

Subscribe

एक वर्षाच्या बंदीनंतर डेविड वॉर्नरने ऑस्ट्रेलियन संघात झोकात पुनरागमन केले. वर्ल्डकप स्पर्धेत त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ सुरुच आहे. टॉन्टनच्या छोट्या मैदानावर वॉर्नर-फिंच या ऑस्ट्रेलियन बिनीच्या जोडीने फटकेबाज शतकी सलामी देताना पाकची गोलंदाजी फोडून काढली. वॉर्नरने १११ चेंडूत १ षटकार आणि ११ चौकारांसह १०७ धावा फटकावल्या. तसेच कर्णधार अ‍ॅरॉन फिंचच्या साथीने १३३ चेंडूतच १४६ धावांची सलामी ऑस्ट्रेलियाला करुन दिली आणि सामनावीराचा किताबही पटकावला.

भारताविरुद्ध ‘कासवछाप’ फलंदाजी करणार्‍या वॉर्नरने ५६ धावांसाठी ८४ चेंडू खर्ची घातले, त्याच्या या कूर्मगती खेळावर टीकाही करण्यात आली. परंतु, कर्णधार अ‍ॅरॉन फिंचचा भक्कम पाठिंबा वॉर्नरला लाभला आहे. वॉर्नरला सूर गवसतोय, त्याचा स्ट्राईक रेटही सुधारत आहे, असे फिंच म्हणाला. पाकविरुध्द शानदार शतक झळकावून वॉर्नरने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. अफगणिस्तानविरुध्द सलामीच्या लढतीत ब्रिस्टलवर वॉर्नरने ११४ चेंडूत नाबाद ८९ धावा फटकावल्या.

- Advertisement -

गेल्या वर्षी, नेमकं सांगायचं तर ३० मार्च २०१८ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुध्द न्यूलँडस्, केपटाऊन कसोटीत चेंडूशी छेडछाड केल्यामुळे (सँडपेपर स्कँडल) तेव्हाचा कर्णधार स्टीव स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. बंदीनंतर वर्ल्डकप स्पर्धेसाठी वॉर्नर, स्मिथचे इंग्लंडमध्ये आगमन झाले, पण काही खोडसाळ प्रेक्षकांची कुत्सित शेरेबाजी, टोमणेबाजीला त्यांना सामोरे जावे लागले.

वॉर्नरने मात्र खेळावर लक्ष केंंद्रित करुन नाबाद ८९, ३, ५६, १०७ अशा ४ सामन्यांत मिळून २५५ धावा फटकावल्या आहेत. ४ वर्षांपूर्वी मायदेशातील वर्ल्डकप स्पर्धेत वॉर्नरने ८ सामन्यांत ३४५ धावा फटकावल्या, त्यात अफगणिस्तानविरुध्द १७८ धावांच्या खेळीचाही समावेश होता.

- Advertisement -

टॉन्टनवरील ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामना पाहायला आलेल्या एका मुलाला वॉर्नरने आपल्याला मिळालेली सामनावीर किताबाची ट्रॉफी देण्याचा उमदेपणा दाखवला. त्या मुलाला तर आनंद झालाच आणि त्याचे पालकही सुखावले. वर्ल्डकपच्या पहिल्या पंधरवडयातच वॉर्नरला परस्परविरोधी अनुभव आले.

एकही प्रथमश्रेणी सामना न खेळता वॉर्नरला कसोटी पर्दापणाची संधी लाभली. ऑस्ट्रेलियन क्रिक्रेटच्या १३२ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात असा पराक्रम करणारा वॉर्नर हा एकमेव खेळाडू! ऑस्ट्रेलियासोबतच न्यू साऊथ वेल्स, सनरायझर्स हैदराबाद अशा विविध संघांकडून खेळणार्‍या वॉर्नरला त्याच्या कारकिर्दीत अनेक वादग्रस्त प्रसंग, घटनांना सामोरे जावे लागले आहे. काही वर्षांपूर्वी रिकी पाँटिंगशी मारामारी केल्यामुळे अ‍ॅशेस मालिकेतील काही सामन्यांना त्याला मुकावे लागले होते.

खेळाडूंच्या मानधनाच्या प्रश्नावरुन ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाशी त्याने पंगा घेतला. बंडखोर वृत्तीच्या वॉर्नरला सांभाळताना कर्णधाराची कसोटीच लागते. केपटाऊन कसोटीतील ‘सँडपेपर’ प्रकरणी तोच प्रामुख्याने जबाबदार असल्याचे म्हटले जाते, याप्रकरणी वॉर्नरच सूत्रधार असला तरी त्याच्यासह कर्णधार स्मिथलाही एक वर्षाच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागले. बॅनक्रॉप्टला नऊ महिन्यांच्या बंदीची शिक्षा झाली. प्रशिक्षक डॅरन लिहमन यांना प्रशिक्षकपद सोडावे लागले.

डावखुरा वॉर्नर हा विलक्षण प्रतिभावान खेळाडू. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील मानाचा ‘अ‍ॅलन बोर्डर पुरस्कार’ वॉर्नरला दोनदा लाभला. कसोटी, वनडे तसेच टी-२० या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ३० वर्षीय वॉर्नरने आपला ठसा उमटवला असून ६३६३ धावा त्याने कसोटी क्रिकेटमध्ये फटकावल्या आहेत. वनडेत त्याच्या खात्यात १५ शतके जमा असून टी-२० क्रिकेटमध्येही त्याची बॅट तळपते. यंदाच्या आयपीएलमध्ये याची प्रचिती आलीच. आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळताना ६९२ धावा फटकावणारा वॉर्नर ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. इंग्लंडमधील वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद आपल्याकडेच राखण्यासाठी ऑस्ट्रेलियायाला निश्चितच कडवा संघर्ष करावा लागेल, ऑस्ट्रेलियन संघाच्या यशात वॉर्नरचा मोलाचा वाटा असेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -