नवी दिल्ली : रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला आहे. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला 295 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. चौथ्या दिवशी 534 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 238 धावांवर रोखले. या विजयासह भारताने पर्थमध्ये विक्रमांचा धडाका लावला. (Jaisprit Bumrah-led Indian team scores a big win over Australia in Perth Test)
ऑप्टस स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या डावात भारतीय संघ 150 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर बॅकफूटवर होता, पण त्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहच्या 5 विकेट्समुळे भारताला दुसऱ्या डावात 46 धावांची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या 161 धावा, केएल राहुलच्या 77 धावा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहलीच्या शतकी खेळीमुळे भारताने दुसऱ्या डावात 533 धावांचा डोंगर उभा केला. यानंतर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात खेळण्यासाठी आमंत्रण देण्यात आले. मात्र तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्याआधी जयप्रती बुमराहने आक्रमक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांना माघारी धाडले. तर हर्षित राणाने ॲलेक्स कॅरीला बाद करून ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले.
चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 534 धावांची गरज होती, तर दुसरीकडे भारताला 7 विकेट्स काढायच्या होत्या. खेळाला सुरुवात झाल्यानंतर मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजा बाद केला. मात्र त्यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पाचव्या विकेटसाठी 62 धावांची भागिदारी केली. मात्र मोहम्मद सिराजने स्मिथला बाद करत ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनी सहाव्या विकेटसाठी 82 धावांची भागिदारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सामन्यात पुनरागमन करेल, अशी शक्यता होती. मात्र बुमराहने हेडला 89 धावांवर बाद केले. यानंतर काही वेळातच आक्रमक खेळी करणाऱ्या मिचेल मार्शला नितेश रेड्डीने 47 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का दिला. मात्र त्यानंतरही ऑस्ट्रेलियाकडून सामन्यात पुनरागमन करण्याचे प्रयत्न सुरुच होते. ॲलेक्स कॅरी आणि मिचेल स्टार्क यांनी आठव्या विकेटसाठी 45 धावांची भागिदारी केली. मात्र वॉशिंग्टन सुंदरने मिचेल स्टार्क आणि नॅथन लिऑन यांना लागोपाठ बाद करत सामना भारताच्या बाजूने फिरवला. यानंतर हर्षित राणा ॲलेक्स कॅरी बाद करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
We say: Bumrah 💬
All of us say: 𝙈. 𝙊. 𝙊. 𝘿 ☺️ 🔥
This is a Jasprit Bumrah appreciation post! 🫡#TeamIndia | #AUSvIND | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/oEiM1K7ls5
— BCCI (@BCCI) November 25, 2024
पर्थमध्ये भारताने केलेले विक्रम
- भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटीत धावांच्या फरकाने सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. यापूर्वीचा भारताने सर्वात मोठा विजय (222 धावांनी) डिसेंबर 1977 मध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानावर मिळवला होता.
- भारताने परदेशातील कसोटीत धावांच्या फरकाने तिसरा सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. यापूर्वी 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने 318 धावांनी विजय मिळवला होता. त्याआधी 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 304 धावांनी विजय मिळवला होता.
- पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाचा विक्रम 4-0 असा होता. त्यांनी 2023 मध्ये पाकिस्तानचा 360 धावांनी, 2018 मध्ये भारताचा 146 धावांनी, 2019 मध्ये न्यूझीलंड संघाचा 296 धावांनी 2022 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धचे सर्व सामने जिंकले होते. मात्र पर्थ मैदनावर कसोटी जिंकणारा जसप्रीत बुमराह पहिला कर्णधार ठरला आहे.
- ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 10 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने जिंकणारा भारत हा आता चौथा पाहुणा संघ ठरला आहे. याआधी इंग्लंड (57), वेस्ट इंडिज (19) आणि दक्षिण आफ्रिका (10) संघाने सामने जिंकले आहेत.
- जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी जिंकणारा 7वा भारतीय कर्णधार ठरला आहे. इतर कर्णधारांमध्ये अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुनील गावस्कर, बिशन सिंग बेदी, सौरव गांगुली आणि अनिल कुंबळे यांचा समावेश आहे.
- विशेष म्हणजे जसप्रीत बुमराह पर्थ येथे कसोटी सामना जिंकणारा दुसरा आशियाई कर्णधार बनला आहे. याआधी अनिल कुंबळेने 2008 मध्ये विजय नोंदवला होता.
- जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात एकापेक्षा जास्त वेळा आठ किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. 2018 आणि 2024 मध्ये त्याने ही कामगिरी केली आहे. 1985 आणि 1992 मध्ये ही कामगिरी करणारा कपिल देव हा भारताचा पहिला खेळाडू होता.