ऑलिम्पिकबाबत जपान पंतप्रधान, आयओसी अध्यक्षांत चर्चा

निर्णय घेण्यासाठी आयओसीवर दबाव

olympic
ऑलिम्पिकबाबत जपान पंतप्रधान, आयओसी अध्यक्षांत चर्चा

करोनाच्या धोक्यामुळे जवळपास सर्वच स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, असे असतानाही टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा वेळापत्रकानुसार म्हणजेच २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत घेण्याचा आयोजक आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा (आयओसी) मानस आहे. परंतु, खेळाडूंकडून ही स्पर्धा पुढे ढकलण्यासाठी दबाव वाढत असल्याने ऑलिम्पिकबाबत निर्णय घेण्यासाठी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे आणि आयओसीचे अध्यक्ष थॉमस बॅच टेलिफोनवरुन चर्चा करणार आहेत.

निर्णय घेण्यासाठी आयओसीवर दबाव

जपानचे पंतप्रधान शिंझो आबे आणि आयओसीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांच्यात आज (मंगळवारी) जपानी वेळेनुसार रात्री ८ वाजता चर्चा होण्याची शक्यता आहे. या चर्चेत टोकियोचे राज्यपाल युरिको कोईके, आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी आणि ऑलिम्पिक मंत्री सेइको हाशिमोटो हेसुद्धा सहभागी होणार आहेत. ऑलिम्पिकबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी आयओसीवर दबाव वाढत आहे. कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी ऑलिम्पिकमधून माघार घेतली असून युएस ऑलिम्पिक समितीनेही ही स्पर्धा पुढे ढकलण्यास सांगितली आहे. परंतु, ऑलिम्पिकला अजून चार महिने शिल्लक असल्याने इतक्यातच कोणताही निर्णय घेणे घाईचे ठरेल असे आयओसीला वाटते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत ऑलिम्पिक पुढे ढकलणे हाच बहुदा योग्य निर्णय आहे, असे पंतप्रधान आबे सोमवारी म्हणाले होते.


हेही वाचा – Corona Breaking: जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक अडवू नका; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आदेश