Homeक्रीडाJasprit Bumrah : बुमराहची विक्रमी कामगिरी; दुसऱ्या दिवशी भारताने घेतली मोठी आघाडी

Jasprit Bumrah : बुमराहची विक्रमी कामगिरी; दुसऱ्या दिवशी भारताने घेतली मोठी आघाडी

Subscribe

विशाखापट्टनम : यशस्वी जयस्वालच्या द्विशतकी खेळीमुळे भारताने पहिल्या डावात 396 धावांचा डोंगर उभा केला होता. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर आटोपला. यासह भारताने 143 धावांची आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे जयप्रीत बुमराहने आज 6 विकेट घेत विक्रमी कामगिरी केली आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने बिनबाद 28 धावा केल्या आहेत. (Jasprit Bumrah record performance India took a big lead on the second day)

हेही वाचा – Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने द्विशतक झळकावून रचला इतिहास; सचिननेही म्हटले “यशस्वी भव:”

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने द्विशतक झळकावले. त्याने वयाच्या 22 व्या वर्षी 277 चेंडूत 209 धवांची खेळी केली. त्यामुळे भारताने पहिल्या डावात 396 धावांचा डोंगर उभा केला. यानंतर इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 59 धावा जोडल्या. मात्र कुलदीप यादवने बेन डकेटला बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर थोड्या थोड्या अंतराने इंग्लंडच्या विकेट पडत होत्या.

 

आज अखेरच्या सत्रात 10 षटकांचा खेळ शिल्लक असताना इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर आटोपला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवला 3 आणि अक्षर पटेलला 1 विकेट मिळाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात बिनबाद 28 धावा केल्या आहेत. सलामीवीर यशस्वी जयस्वालने 15, तर कर्णधार रोहित शर्माने 13 धावा केल्या आहेत.

हेही वाचा – Poonam Pandey Return : आयएफटीडीए अध्यक्ष पूनम पांडेवर संतापले; कडक कारवाईची मागणी

सर्वात कमी डावात 150 विकेट घेण्याचा विक्रम

जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. बुमराहने या सामन्यात सर्वाधिक 6 विकेट घेत सर्वात कमी डावात 150 विकेट घेण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. त्याने माजी कर्णधार कपील देव यांच्या 67 डावात 150 विकेट घेण्याचा विक्रम मागे टाकला आहे. बुमराहने 6 हजार 781 चेंडूत ही कामगिरी केली. याआधी हा विक्रम उमेश यादवच्या नावावर होता, त्याने 7 हजार 661 चेंडूत 150 विकेटचा टप्पा पार केला होता. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मोहम्मद शमी, चौथ्या क्रमांकावर कपील देव, पाचव्या क्रमांकावर आर अश्विन आहे. याशिवाय कसोटीत 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेण्याची बुमराहची ही 10वी वेळ आहे.